

पुढारी ऑनलाईन डेस्क : केंद्र सरकारने माजी अग्निवीरांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. बॉर्डर सिक्युरिटी फोर्स (बीएसएफ) आणि सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स (सीआयएसएफ) च्या भरतीमध्ये माजी अग्निवीरांना 10 टक्के आरक्षण दिले जाईल. याशिवाय त्यांना वयोमर्यादा आणि शारीरिक चाचणीतही सूट देण्याची घोषणा करण्यात आली आहे. केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने हा निर्णय घेतला असून सीआयएसएफच्या महासंचालक नीना सिंह आणि बीएसएफचे महासंचालक नितीन अग्रवाल यांनी ही माहिती दिली आहे.
खरे तर, 18 जून 2022 रोजी गृह मंत्रालयाने एक अधिसूचना जारी केली होती आणि CAPF आणि आसाम रायफल्समध्ये भरती प्रक्रियेत माजी अग्निवीर जवानांना 10 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. CAPF मध्ये BSF, CRPF, ITBP, SSB आणि CISF यांचा समावेश होतो.
CISF च्या DG नीना सिंह म्हणाल्या, ‘भविष्यात कॉन्स्टेबलच्या सर्व भरतींमध्ये 10 टक्के नोकऱ्या माजी अग्निवीर जवानांसाठी राखीव ठेवल्या जातील. कोणतीही शारीरिक चाचणी द्यावी लागणार नाही. वयात सवलत दिली जाईल. पहिल्या बॅचसाठी वयाची सवलत 5 वर्षांसाठी असेल. परंतु पुढील बॅचसाठी ही सवलत फक्त 3 वर्षांसाठी असेल.’
बीएसएफचे डीजी नितीन अग्रवाल म्हणाले, ‘अग्निवीर योजनेतून सैनिकांना 4 वर्षांचा अनुभव मिळाला आहे. त्यांना पूर्णपणे शिस्तबद्ध आणि प्रशिक्षित करण्यात आले आहे. बीएसएफसाठी हे खूप चांगले आहे. प्रशिक्षणानंतर निवडक अग्निवीर जवानांना सीमेवर तैनात केले जाईल.’
केंद्र सरकारने 2022 मध्ये अग्निवीर योजना सुरू केली होती. त्याअंतर्गत लष्कर, नौदल आणि हवाई दलात चार वर्षांसाठी युवकांची कंत्राटी पद्धतीने भरती केली जाते. 4 वर्षात सहा महिन्यांचे प्रशिक्षण देखील समाविष्ट आहे. चार वर्षांनंतर अग्निवीरांना त्यांच्या कार्यक्षमतेच्या आधारे मानांकन देण्यात येणार आहे. या गुणवत्तेच्या आधारे 25% अग्निवीरांना सेवेत कायम घेतले जाईल.