

China land grab Arunachal Pradesh
गुवाहाटी : अरुणाचल प्रदेशातील अपर सुबानसिरी जिल्ह्यातील सीमावर्ती 'नाह' आदिवासी समाजाने चीनकडून भारतीय भूभागावर अतिक्रमण केल्याचा गंभीर आरोप केला आहे. गेल्या सहा वर्षांत चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने त्यांच्या पारंपरिक गुरे चरण्याच्या, शिकार आणि शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या मोठ्या भूभागावर कब्जा केल्याचा दावा या समाजाने केला आहे. तसेच भारतीय हद्दीत रस्ते आणि लष्करी छावण्याही उभारल्याचा आरोप करण्यात आला आहे.
नाह वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्ष केरू चाडेर यांनी नुकत्याच अपर सुबानसिरीचे उपायुक्त यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, "काही वर्षांपूर्वीपर्यंत आम्ही मुक्तपणे फिरत असलेली आमची पूर्वजांची जमीन, जंगलातील उत्पादने गोळा करण्याची ठिकाणे आणि गुरे चारत असलेल्या जमिनीचा मोठा भाग आता चीनच्या पीएलएच्या ताब्यात गेला आहे."
पाच ठिकाणांवर चीनने प्रभाव वाढवला
अपर सुबानसिरीमधील ताकसिंग महसूल क्षेत्रातील पाच ठिकाणांमध्ये चीनने हळूहळू आपला प्रभाव वाढवला आहे. आंतरराष्ट्रीय सीमेवरील महत्त्वाच्या भागांवर धोरणात्मक पद्धतीने कब्जा करून चीन आपले नियंत्रण वेगाने विस्तारत असल्याचा दावाही करण्यात आला आहे.
दरम्यान, नाचो मतदारसंघाचे आमदार नाकाप नालो यांनी या प्रकरणाची अधिकृत पडताळणी होणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. "हा राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित विषय असल्याने प्रशासनाने या आरोपांची अधिकृत पुष्टी करणे गरजेचे आहे. राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने या दाव्यांबाबत चिंता निर्माण होणे स्वाभाविक आहे," असे ते म्हणाले.
ताकसिंग सीमावर्ती भागात चीनच्या हालचालींमध्ये वाढ
नाह वेल्फेअर सोसायटीनुसार, गेल्या १० ते १५ वर्षांत ताकसिंग सीमावर्ती भागात चीनच्या हालचालींमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. शक्य तितक्या अधिक भूभागावर ताबा मिळवण्याच्या उद्देशाने ही कारवाई सुरू असल्याचा आरोप संस्थेने केला आहे.
संस्थेच्या दाव्यानुसार, २०२० पर्यंत त्यांच्या पारंपरिक नियंत्रणाखाली असलेली ओयिंग (असाफिला क्षेत्र), पनियार (चुजार्ता क्षेत्र), मारपान (मारनाफे), पोट्रांग (तलाव परिसर) आणि टिंडिंगटांग (टीजी) ही ठिकाणे हळूहळू चीनच्या घुसखोरीच्या कक्षेत आली आहेत. यापैकी काही ठिकाणे ताकसिंग मुख्यालयाच्या अगदी जवळ असून काहींना धार्मिक आणि तीर्थस्थळाचे महत्त्वही आहे.
अरुणाचल प्रदेश सरकार गप्प का?
निवेदनात चाडेर यांनी म्हटले आहे की, "आमचा भारतीय लष्करावर पूर्ण विश्वास आहे. अनेक वर्षांपासून ते आमच्या भूमीचे रक्षण करत आहेत. मात्र, सध्या ताकसिंग भागात चीनच्या कारवायांचा वेग आणि त्यामागील हेतू अत्यंत चिंताजनक आहे. आमची जमीन दिवसेंदिवस इंच-इंच करून आमच्या हातातून निसटत आहे." या प्रकरणावर अद्याप जिल्हा प्रशासन किंवा अरुणाचल प्रदेश सरकारने कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.