Telangana Chemical factory Blast :
संगारेड्डी : तेलंगणातील संगारेड्डी जिल्ह्यातील पासामैलाराम येथील एका रासायनिक कारखान्यात सोमवारी सकाळी भीषण स्फोट झाला. स्फोट इतका मोठा होता की परिसरातील लोक घाबरले. संपूर्ण परिसरात धुराचे लोट दिसत होते. आगीच्या ज्वाळांनी कारखान्याला पूर्णपणे वेढले. यात १० कामगारांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
घटनेची माहिती मिळताच ११ अग्निशमन गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या, आग विझवण्याचे काम सुरू आहे. तेलंगणा अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले, "ही घटना सिगाची फार्मा कंपनी, पासामैलाराम फेज १ येथे घडली. ११ अग्निशमन गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. सुमारे १५ ते २० लोक जखमी झाले आहेत." दरम्यान, प्रशासनाकडून बचावकार्य सुरू असून, अद्याप कोणताही मृतदेह सापडलेला नाही. संगारेड्डीचे पोलीस अधीक्षक परितोष पंकज यांनी एएनआयला सांगितले, "आत्तापर्यंत कोणताही मृतदेह सापडलेला नाही, बचावकार्य सुरू आहे, लवकरच अधिक माहिती देऊ."