

Meghalaya Assam Highway Approval
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमडळाच्या आर्थिक व्यवहारविषयक समितीने मेघालय आणि आसाम दरम्यानच्या १६६.८० किलोमीटर लांबीच्या राष्ट्रीय महामार्गाला बुधवारी (दि.३०) मंजुरी दिली. शिलाँगजवळील शमावलिंखुंग ते आसाममधील पंचग्राम (सिल्चरजवळ) पर्यंतच्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ च्या भागाच्या बांधकामाला ही मंजुरी देण्यात आली आहे. यासाठी एकूण भांडवली खर्च २२ हजार ८६४ कोटी रुपये खर्च होणार आहे, अशी माहिती केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली.
सदर प्रकल्पाचा १६६.८० किलोमीटरपैकी मेघालयमध्ये १४४.८० किमी आणि आसाममध्ये २२ किलोमीटर आहे. या प्रस्तावित ग्रीनफिल्ड द्रुतगती मार्गिकेमुळे गुवाहाटी ते सिल्चर दरम्यानच्या वाहतुकीत सुधारणा होईल, असे केंद्रीय मंत्री वैष्णव म्हणाले. या मार्गिकेच्या विकासामुळे प्रवासाचे अंतर आणि प्रवासाच्या वेळेत लक्षणीय घट झाल्यामुळे त्रिपुरा, मिझोराम, मणिपूर आणि आसामच्या बराक खोऱ्यातील भागाच्या संपर्कव्यवस्थेत सुधारणा होईल. ही मार्गिका आसाम आणि मेघालय यांच्यातील संपर्कव्यवस्था सुधारेल, असे केंद्र सरकारने म्हटले आहे.