

बंगळूर : सोने खाणींसाठी प्रसिद्ध असणार्या कर्नाटकातील धारवाड जिल्ह्यातील हट्टी गोल्ड माईन्स (एचजीएमएल), कोलार गोल्ड फिल्डस्ना किल्लारहट्टी आणि चिन्नीकट्टीत उत्खननासाठी केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. वर्षभरासाठी याबाबतची निविदा मंजूर केली आहे.
नॅशनल मिनरल्स एक्स्प्लोरेशन ट्रस्टने (एनएमईटी) एकूण पाच ठिकाणी सोने उत्खननाबाबत गतवर्षी पाहणी केली होती. आता सोन्याचे दर वाढल्याने दोन ठिकाणी उत्खनन करण्याची तयारी सुरू केली आहे. किल्लारहट्टी हे गाव कोप्पळ आणि रायचूर जिल्ह्याच्या सीमेवर आहे, तर चिन्नीहट्टी गाव हावेरी जिल्ह्यात आहे. उर्वरित सोन्याच्या खाणींचे प्रदेश झारखंड, ओडिशा आणि लडाख येथे आहेत.
केंद्रीय कोळसा आणि खाणमंत्री जी. कृष्णरेड्डी यांनी लोकसभेत याविषयीची माहिती दिली आहे. किल्लारहट्टीत सर्वेक्षण केले आहे. चिन्नीकट्टीत स्टेज जी 3 मध्ये असणार्या खनिजांची चाचणी सुरू आहे. भूगर्भीय चाचणी करून तेथील खनिजांच्या नमुन्यांवर संशोधन सुरू आहे. सोने व इतर पूरक धातूंचे अस्तित्व असल्याचे दिसून आले आहे. मायनिंग टेक
कन्सल्टन्सी सर्व्हिसेस कंपनीला दोन्ही ठिकाणचे कंत्राट दिले आहे. किल्लारहट्टीत उत्खननासाठी 10 महिने आणि चिन्नीकट्टीत उत्खननासाठी 12 महिन्यांसाठीचे कंत्राट देण्यात आले आहे. याची रक्कम 8.3 कोटी रुपये आहे. याआखी राज्य आणि केंद्र सरकारने सोन्याच्या अस्तित्वाचा शोध घेण्यासाठी हावेरी जिल्ह्यामध्ये उत्खनन केले होते; पण, त्यांना अपयश आले होते. केंद्राने आता परवानगी दिली तरी राज्य वन खात्याने उत्खननासाठी परवानगी दिलेली नाही.
रायचूर आणि कोप्पळमध्ये सोन्याच्या खाणकामासाठी उत्खननास केंद्र शासनाने परवानगी दिल्याचे स्वागत आहे. अशाप्रकारचे प्रकल्प या भागासाठी हवे आहेत. रोजगारनिर्मिती करणारे, पर्यावरणस्नेही उद्योगांची गरज आहे.
जी. कुमार नाईक खासदार, रायचूर