Central Railway Diwali special trains:
मुंबई : दिवाळी आणि छटपूजेसाठी प्रवाशांच्या गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी मध्य रेल्वेने ९४४ आरक्षित आणि अनारक्षित विशेष गाड्या सोडण्याचे नियोजन केले आहे. मुंबई, पुणे, कोल्हापूर, नागपूर विभागातून कोल्हापूर, सावंतवाडीसह दक्षिण आणि उत्तर भारतातील विविध शहरांमध्ये गाड्या सोडण्यात येणार आहेत.
यावर्षी १८ ऑक्टोबर रोजी धनत्रयोदशीपासून दिवाळीला तर २२ ऑक्टोबरपासून छट पूजेला सुरुवात होणार आहे. यामध्ये तिरुवनंतपुरम नॉर्थ, हजरत निजामुद्दीन, सांगानेर, गोरखपूर, कलबुरगी, दानापूर या भागातील प्रवाशांसाठी मध्य रेल्वेने विशेष गाड्यांचे नियोजन केले आहे. यामध्ये वातानुकूलित, शयनयानासह अनारक्षित मिश्र व्यवस्था असलेल्या गाड्यांचा समावेश आहे.
महत्त्वाच्या स्थानकांवर प्रवाशांना मार्गदर्शन करण्यासाठी 'मे आय हेल्प यू' बूथ उभारण्यात येणार आहेत. प्रवाशांच्या सोयीसाठी विविध स्थानकांवर तिकीट काउंटरची संख्या वाढवली जाणार आहे. एलटीटी आणि सीएसएमटीसारख्या प्रमुख स्थानकांवर प्रवासी 'होल्डिंग एरिया' तयार करण्यात येणार आहेत. अतिरिक्त आरपीएफ कर्मचारी आणि तिकीट तपासणीस तैनात केले जाणार आहे.
मध्य रेल्वेने यंदाच्या दिवाळी आणि छट पूजेसाठी २६ सप्टेंबर पासून २९ नोव्हेंबर पर्यंत विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. ट्रेन मुंबईसह भारताच्या विविध ३ भागांमध्ये जाणार आहेत. महाराष्ट्रातील लातूर, सावंतवाडी रोड, नागपूर, पुणे, कोल्हापूर, नांदेड, अशा विविध ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांसाठी उत्सव विशेष गाड्या चालवल्या जाणार आहेत. तर दक्षिणेकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी करीमनगर, कोचुवेली, काझीपेट, बेंगळुरू आणि इतर ठिकाणांसारख्या विविध ठिकाणी विशेष गाड्या चालवल्या जाणार आहेत.