
नवी दिल्ली : खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नूने अयोध्येतील राम मंदिरासह हिंदू मंदिरांना उडवण्याच्या धमक्या दिल्या आहेत. सरकारने प्रतिबंधित केलेल्या शिख फॉर जस्टिस (एसएफजे) संघटनेने जारी केलेल्या कथित व्हिडिओमध्ये, पन्नूने १६ आणि १७ नोव्हेंबर रोजी हल्ल्याचा इशारा दिला आहे. ब्रॅम्प्टन, कॅनडात रेकॉर्ड केलेल्या या व्हिडिओचा उद्देश हिंदू प्रार्थनास्थळांविरुद्ध हिंसाचार भडकवण्याचा आहे. केंद्र सरकार पन्नूच्या या कथित व्हिडिओची सत्यता तपासत आहे. कॅनडा आणि भारत यांच्यातील संबंधांमध्ये अलीकडच्या काळात आलेले चढउतार पाहता केंद्र सरकार सध्या याला फारसे महत्त्व देण्याच्या मनस्थितीत नाही.
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर सातत्याने बॉम्बने विमाने उडवण्याच्या धमक्या येत आहेत. तपासादरम्यान ही बाब पूर्णपणे खोटी असल्याचे निष्पन्न झाले. हे पाहता सरकारने सोशल मीडियावरून दिलेल्या धमक्यांवर घाईघाईने प्रतिक्रिया देणे बंद केले आहे. त्यांची चौकशी केल्यानंतरच सरकार या माध्यमातून प्रसारित होणाऱ्या धमक्यांना उत्तर देईल. केंद्र सरकार अशा अफवांना फारसे महत्त्व देण्याच्या मनस्थितीत नाही. त्यामुळेच पन्नू प्रकरणातील व्हिडिओ प्रसिद्ध झाल्यानंतरही त्यावर सरकारकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. केंद्र सरकारने सर्व प्रमुख ठिकाणी सुरक्षा व्यवस्था कडेकोट ठेवण्याच्या सूचना दिल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
हिंसक हिंदुत्व विचारसरणीची जन्मभूमी असलेल्या अयोध्येचा पाया आम्ही हादरवून टाकू, असे पन्नूने कथित व्हिडीओमध्ये म्हटले आहे. या व्हिडिओमध्ये या वर्षी जानेवारीमध्ये उद्घाटनावेळी पंतप्रधान मोदी राम मंदिरात प्रार्थना करत असल्याचे चित्र दिसत आहे.