पुढारी ऑनलाईन डेस्क : खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू (Gurpatwant Singh Pannun) पुन्हा बरळला आहे. त्याने अयोध्येतील श्रीराम मंदिरासह (Ram Mandir in Ayodhya) अन्य हिंदू मंदिरे उडवून देण्याची धमकी दिली आहे. याबाबत बंदी घातलेल्या शीख फॉर जस्टिस (SFJ) संघटनेने एक व्हिडिओ जारी केला आहे. त्यात पन्नूनने १६ आणि १७ नोव्हेंबर रोजी मंदिरांवर हल्ला करण्याचा इशारा दिलाय. कॅनडातील (Canada) ब्रॅम्प्टन येथून हा व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे.
"आम्ही हिंदुत्व विचारसरणीचे मूळ असलेल्या अयोध्येला हादरवून टाकू" असे पन्नू यांनी म्हटले आहे. या व्हिडिओत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जानेवारीतील राम मंदिराच्या उद्घाटनावेळी प्रार्थना करत असल्याचे दृश्य दाखण्यात आले आहे. पन्नू याने कॅनडातील भारतीयांना हिंदू मंदिरांवरील खलिस्तानी हल्ल्यांपासून दूर राहण्याचा इशाराही दिला आहे.
गेल्या महिन्यात पन्नूने भारतीय विमान बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली होती. शीख दंगलीला ४० वर्षे पूर्ण होत असून या पार्श्वभूमीवर एअर इंडियाच्या विमानावर हल्ला केला होऊ शकतो, असे म्हणत पन्नूने प्रवाशांना १ ते १९ नोव्हेंबरदरम्यान एअर इंडियाच्या विमानातून प्रवास न करण्याचा इशारा दिला होता.
स्वतंत्र शीख राज्याच्या कल्पनेला चालना देण्याच्या उद्देशाने काम करत असलेल्या पन्नूच्या शीख फॉर जस्टिस संघटनेचा भारतविरोधी विविध कारवायांमध्ये सहभाग आहे. पन्नूने जातीय सलोखा बिघडवण्याच्या उद्देशाने अनेक प्रक्षोभक विधाने जारी केली आहेत.
अलीकडच्या काही वर्षांत कॅनडातील हिंदू मंदिरांवर हल्ले आणि कट्टरपंथी खलिस्तानी घटकांकडून हिंदू समुदायाला धमक्या देण्याचे प्रकार वाढले आहेत. गेल्या आठवड्यात कॅनडातील ब्रॅम्प्टन येथील हिंदू सभा मंदिरातील भविकांवर खलिस्तानी समर्थकांनी हल्ला केला होता.