

नवी दिल्ली/लातूर : नीट पेपरफुटीचा तपास सीबीआयने हाती घेतल्यानंतर अटकसत्र सुरू झाले असून या घोटाळ्यात लातूरसोबतच बीडचेही नाव समोर आले आहे. आरोपींकडे सापडलेल्या १४ प्रवेशपत्रांपैकी एक लातूरच्या तर सात बीडच्या विद्यार्थ्यांचे असल्याने तपासाचे लक्ष बीडवरही केंद्रित झाले आहे. सीबीआयचे पथक लवकरच लातूरला येणार असल्याचे समजते.
नीट पेपरफुटीत महाराष्ट्राचे कनेक्शन लातूरमुळे जोडले गेले. पोलिसांनी आतापर्यंत चारजणांवर गुन्हे नोंदवले असून संजय जाधव आणि जलील पठाण यांना अटक केली आहे. इतर दोन आरोपी फरार आहेत. लातूर पोलिसांनी आरोपीचे मोबाईल तपासले असता बीडचे कनेक्शनही समोर आले. यामध्ये आरोपींनी केलेले विविध ठिकाणचे आर्थिक व्यवहार, दिल्ली स्थित आरोपी गंगाधर याच्याबरोबर झालेले आर्थिक व्यवहार, मोबाईलमध्ये आढळलेले १४ प्रवेशपत्र, परराज्यातील वेगवेगळ्या नीट पेपर सेंटरची माहिती पोलिसांना हाती लागली. एकूण १४ पैकी आठ प्रवेशपत्र हे परराज्यातील आहेत. त्यापैकी सात प्रवेशपत्र बीड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे आहेत; तर एक प्रवेशपत्र हे लातूर जिल्ह्यातील विद्यार्थ्याचे आहे.
पेपरफुटी आणि इतर गैरव्यवहारांसंबंधीचे रॅकेट बिहार, झारखंड, गुजरात आणि महाराष्ट्र या चार राज्यांतूनच झाल्याचा सीबीआयला संशय असून सीबीआयने या राज्यांवर तपास केंद्रित केला आहे. सीबीआयच्या पथकांनी शनिवारी गुजरातमध्ये आणंद, खेडा, अहमदाबाद आणि गोध्रा या चार जिल्ह्यांतील सात ठिकाणी छापे टाकले. गोध्रा येथील एका विशिष्ट परीक्षा केंद्राचा आग्रह या साखळीतील दलाल करीत होते. तेथे सेंटर आलेल्या विद्यार्थ्यांकडून कोरे चेक लिहून घेण्यात आले होते. या विद्यार्थ्यांना योग्य ती मदत केल्यानंतर हे चेक रक्कम टाकून वटवले जाणार होते. सीबीआयच्या पथकाने झारखंडमध्ये झारखंडच्या हजारीबाग येथील ओअॅसिस स्कूलचा मुख्याध्यापक अहसान उल हक आणि उपमुख्याध्यापक इम्तियाज आलम यांना अटक केली आहे. अहसान हक हा ५ मे रोजी झालेल्या नीटचा समन्वयक होता तर उपमुख्याध्यापक इम्तियाज आलम हा एनटीएचा निरीक्षक व केंद्र समन्वयक होता. येथूनच पेपर फुटला असून त्यासाठी त्यांना मदत करणारा पत्रकार जमालुद्दीन अन्सारी यालाही शनिवारी अटक करण्यात आली.
पाटणा : नेट परीक्षेच्या पेपरफुटीचा तपास करणाऱ्या सीबीआयच्या पथकावर बिहारमध्ये नवाडा जिल्ह्यातील कसीयाधीह खेड्यात ग्रामस्थांनी शुक्रवारी हल्ला केला. याप्रकरणी २०० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेट पेपरफुटीचा तपास करणाऱ्या पथकाला एका मोबाईलचे लोकेशन मिळाले. त्याचा माग काढत चार पुरुष व एक महिला कर्मचारी असे पाचजणांचे सीबीआय पथक त्या गावी पोहोचताच हा हल्ला झाला.
नीटपाठोपाठ नेटच्या परीक्षेचा पेपर फुटल्यानंतर अनेक परीक्षा स्थगित करण्यात आल्या होत्या. आता एनटीएने नेटच्या काही परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार १० जुलै रोजी एनसीइटीची परीक्षा होईल. जॉईंट सीएसआयआय यूजीसी नेट परीक्षा २५ ते २७ जुलै या कालावधीत घेतली जाईल तर यूजीसी नेटची जूनमधील परीक्षा २१ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या कालावधीत घेण्यात येईल. याशिवाय आयुष अभ्यासक्रमासाठीची एआयएपीजीईटी ही परीक्षा मात्र ठरल्याप्रमाणे ६ जुलै रोजी घेण्यात येणार आहे, असे एनटीएने म्हटले आहे.