

CBI raid on Bhagwant Mann camp office : पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या कॅम्प ऑफिसवर केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) आज (दि. ६) छापा टाकला. मुख्यमंत्र्यांचे अधिकारी (ओएसडी) राजबीर घुमन यांच्याशी संबंधित एका प्रकरणात सीबीआयने ही कारवाई केल्याचे वृत्त 'एएनआय'ने दिले आहे. चंदीगडमधील सेक्टर-२ स्थित ५० क्रमांकाच्या बंगल्यावर ही छापेमारी करण्यात आली असून, हेच ठिकाण मुख्यमंत्र्यांचे कॅम्प ऑफिस म्हणून वापरले जाते.
रिपोर्टनुसार, सीबीआयचे पथक मान यांच्या घरी पोहोचले. त्यांनी तपासणी सुरू केली. या छाप्यात कोणती कागदपत्रे किंवा इतर वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत हे अद्याप स्पष्ट झालेले नाही आणि तपास यंत्रणेने या कारवाईबाबत अद्याप अधिकृत तपशील जाहीर केलेला नाही.
कॅम्प ऑफिसवर सीबीआयची कारवाई झाल्याची माहिती मिळताच मुख्यमंत्री भगवंत मान यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर (ट्विटर) पोस्ट करत संताप व्यक्त केला. "पंजाब सरकार आणि मला बदनाम करण्यासाठी राज्य सरकारविरुद्ध ईडी आणि सीबीआयचा गैरवापर केला जात आहे," असा थेट आरोप मान यांनी केला. अशा प्रकारच्या कारवायांमधून पंजाब सरकारची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचेही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने ५ ऑक्टोबर २०२६ रोजी राजबीर सिंह घुमन यांच्याशी संबंधित प्रकरणात सीबीआय तपासाचे आदेश दिले होते. या न्यायालयीन आदेशानंतर सीबीआयने ही मोठी कारवाई केली आहे.या प्रकरणाची मुळे अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) तपासात दडलेली आहेत. एक हाउसिंग सोसायटी आणि जमिनीचा वापर बदलण्याची परवानगी (सीएलयू - चेंज ऑफ लँड युज) देण्यातील कथित आर्थिक गैरव्यवहाराचा ईडीकडून तपास सुरू होता. या तपासादरम्यान राजबीर सिंह घुमन आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांची नावे समोर आली आहेत. त्यानंतर ईडीने पंजाब पोलिसांच्या महासंचालकांना (डीजीपी) तीन वेळा पत्र लिहून घुमन आणि त्यांच्या साथीदारांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली होती.