

Hapur Car Accident
वेगाने आलेली एक अनियंत्रित कार थेट हॉटेलमध्ये घुसली. कार चालकाने चौघांना चिरडले. या भीषण अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील हापूड जिल्ह्यात घडली असून, अपघाताचा संपूर्ण थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
हापूड जिल्ह्यातील बाबूगढ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुचेसर रोड चौपला येथील 'राजा जी हवेली' हॉटेलमध्ये सोमवारी (दि. ३० जून) रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास ही घटना घडली. बुलंदशहर जिल्ह्यातील फरादपूर येथे राहणारा अजितपाल आपल्या प्रेयसीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी हॉटेलमध्ये आला होता. अजितपाल आणि त्याची प्रेयसी इतर दोघांसोबत हॉटेलच्या आवारात खुर्च्यांवर बसले होते. त्याचवेळी, महामार्गावरून एक अनियंत्रित कार वेगाने आली आणि थेट हॉटेलमध्ये घुसली. काही कळण्याच्या आतच कारने या चौघांनाही चिरडले. या भीषण अपघातात अजितपाल याचा जागीच मृत्यू झाला, तर त्याची प्रेयसी आणि अन्य दोघे जण जखमी झाले. अपघातानंतर कारचालक घटनास्थळावरून फरार झाला.
अजितपाल हा दिल्ली जल बोर्डमध्ये कंत्राटी कर्मचारी म्हणून नोकरी करत होता. सोमवारी सायंकाळी वाढदिवसाच्या पार्टीला जात असल्याचे त्याने आईला सांगतिले होते. भीषण अपघाताची माहिती मिळताच त्याच्या कुटुंबीयांनी घटनास्थळी धाव घेतली. हा अपघात नसून हत्या असावी, असा संशय कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे. अजितपाल हा तीन बहिणींना एकुलता एक भाऊ होता. पोलिसांनी हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून, फरार झालेल्या कारचालकाचा शोध सुरू केला आहे.