

हैदराबाद : गांजाच्या झाडाच्या बिया आणि पाने १९८५ च्या अंमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक पदार्थ कायद्यामध्ये नमूद केल्याप्रमाणे गांजाच्या कायदेशीर व्याख्येत येत नाहीत, असे आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाने स्पष्ट केले.
न्यायमूर्ती के. श्रीनिवास रेड्डी यांच्या एकल खंडपीठाने एका महत्त्वपूर्ण निकालात हे निरीक्षण नोंदवले. या कायद्याच्या तरतुदींनुसार, केवळ गांजाच्या झाडाचा फुलोरा किंवा फळे येणारे शेंडे हेच 'गांजा' म्हणून गणले जातात आणि म्हणूनच त्यावर कायदेशीर बंदी आहे. गांजाची पाने आणि बिया बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या दोन व्यक्तींना जामीन मंजूर करताना न्यायालयाने हे निरीक्षण नोंदवले.
न्यायालयाने म्हटले की, "गांजाच्या झाडाला फुले किंवा फळे येणारे शेंडे नसताना, केवळ बिया आणि पानांचा 'अंमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक पदार्थ कायदा, १९८५' च्या कलम २ (iii) (b) अंतर्गत 'गांजा'च्या व्याख्येत समावेश होत नाही." याचिकाकर्त्यांना दीड किलोहुन अधिक गांजा बाळगल्याच्या आरोपाखाली या कायद्याच्या तरतुदींनुसार अटक करण्यात आली होती. जप्त केलेल्या मालाची तपासणी केल्यावर, याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी असा युक्तिवाद केला की, जप्त केलेल्या पदार्थात केवळ बिया आणि पाने होती. प्रतिबंधित फुलोरा किंवा फळांचे भाग नव्हते. वकिलांनी कायद्यानुसार गांजाची व्याख्या स्पष्ट करणाऱ्या पूर्वीच्या निकालांचाही आधार घेतला. न्यायालयाने हा युक्तिवाद मान्य केला आणि म्हटले की, जप्त केलेल्या पदार्थात फुलोरा किंवा फळांचे शेंडे असल्याचे दर्शवणारा कोणताही पुरावा रेकॉर्डवर नाही. अशा परिस्थितीत, ही जप्ती कायद्यातील शिक्षापात्र तरतुदींना लागू होत नसल्याचे सांगत न्यायालयाने याचिकाकर्त्यांना जामीन मंजूर केला.
या निर्णयामुळे गांजाशी संबंधित प्रकरणांमध्ये पोलिस आणि तपास यंत्रणांसाठी नवे मार्गदर्शन मिळण्याची शक्यता आहे. विशेषतः ज्या प्रलंबित प्रकरणांमध्ये केवळ गांजाची बियाणे किंवा पाने जप्त करण्यात आली आहेत आणि त्यात फुलांचे घटक नाहीत, अशा प्रकरणांवरही परिणाम होऊ शकतो. एनडीपीएस कायदा, १९८५ भारतात अमली पदार्थांवरील नियंत्रणासाठी लागू करण्यात आला आहे. याच्या कलम २(iii)(b) मध्ये स्पष्टपणे नमूद केलं आहे की “गांजा म्हणजे वनस्पतीचा फुलोरा किंवा फळांचा भाग (जेव्हा बी व पाने फुलोऱ्याशिवाय असतील ते त्यात समाविष्ट नाहीत).” न्यायमूर्ती रेड्डी यांच्या या निर्णयामुळे कायद्याच्या मूळ हेतूला अधिक स्पष्टता मिळाली आहे.