

Bihar Assembly Election 2025
नवी दिल्ली : 2025 मधील बिहार विधानसभा निवडणुका दोन किंवा तीन टप्प्यांमध्ये घेतल्या जाऊ शकतात, अशी माहिती निवडणूक आयोगातील सूत्रांनी दिली आहे. यावेळी दिवाळी (20 ऑक्टोबर) आणि छठपूजा (28 ऑक्टोबर) या मोठ्या सणांचा विचार करून मतदानाचे वेळापत्रक ठरवले जाणार आहे.
सध्याच्या विधानसभा कालावधीचा शेवट 22 नोव्हेंबरला होत असल्यामुळे, त्याआधी सर्व निवडणूक प्रक्रिया – मतदान, मतमोजणी आणि निकाल जाहीर – पूर्ण व्हायला हवी.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार या महिन्यात बिहारच्या दौऱ्यावर जाणार आहेत, तिथल्या निवडणूक तयारीची पाहणी करण्यासाठी.
निवडणूक आयोगाकडून सध्या BLO (Booth Level Officer) यांना प्रशिक्षण दिलं जात आहे, जेणेकरून निवडणूक निष्पक्ष राहील आणि मतदार यादीविषयी कोणतेही आरोप टाळता येतील. 2024 च्या महाराष्ट्र, हरियाणा आणि दिल्ली निवडणुकांनंतर काँग्रेस व इतर विरोधी पक्षांनी मतदार यादीत गोंधळाचा आरोप केला होता.
त्याच पार्श्वभूमीवर BLO अधिकाऱ्यांना ओळखपत्रं देण्यात येणार आहेत आणि ते घरोघरी जाऊन मतदारांची पडताळणी करतील.
मतदार यादी अपडेट करण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे, ज्यामुळे नवीन मतदार (18 वर्षे पूर्ण केलेले) नोंदवता येतील आणि डुप्लिकेट मतदार ओळखपत्रांचा त्रास टाळता येईल.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निवडणूक आयोग कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) गैरवापराच्या संभाव्य धोक्यांविषयी जागरूक असून, त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाययोजना करत आहे.
2020 मध्ये बिहार विधानसभा निवडणुका तीन टप्प्यांमध्ये पार पडल्या – 28 ऑक्टोबर, 3 नोव्हेंबर आणि 7 नोव्हेंबर. निकाल 10 नोव्हेंबरला जाहीर झाले. भाजप आणि जनता दल (युनायटेड) आघाडीकडून जोरदार विजय झाला होता. मात्र, त्यानंतर मोठं राजकीय नाट्य उभं राहिलं.
मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी 2022 मध्ये भाजपला रामराम ठोकत आरजेडी (राष्ट्रीय जनता दल) सोबत हातमिळवणी केली. पण 2024 च्या सुरुवातीलाच त्यांनी पुन्हा एकदा पलटी मारत भाजपकडे पुनरागमन केलं.
2025 च्या बिहार निवडणुकीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे. एकीकडे नितीश कुमार यांचा पुढचा पवित्रा काय असेल याकडे आणि दुसरीकडे भाजपकडून आगामी निवडणूक सत्रासाठी उभ्या केल्या जाणाऱ्या ताकदीकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे.
निवडणुकीत भाजप आणि मुख्यमंत्री नितीशकुमार यांचा जनता दल युनायटेड विरूद्ध काँग्रेस आणि लालू प्रसाद यादव यांचा राष्ट्रीय जनता दल अशी मुख्य लढाई असेल.
याशिवाय दिवंगत केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचा लोकजनशक्ती पक्ष, सीपीआय, सीपीएम हे डावे पक्ष, जीतनराम मांझी यांचा हिंदुस्थान आवाम मोर्चा सेक्युलर हा पक्ष तसेच असदुद्दीन ओवैसी यांचा एमआयएम हे पक्ष महत्वाचे असतील.