BSNL Profit | PM मोदींच्या स्वप्नपूर्तीकडे वाटचाल! बीएसएनएल १७ वर्षांनंतर पहिल्यांदाच नफ्यात

ज्योतिरादित्य शिंदे म्हणाले, टर्निंग पॉइंट...
BSNL Q3 results
PM मोदींच्या स्वप्नपूर्तीकडे वाटचाल! बीएसएनएल १७ वर्षांनंतर पहिल्यांदाच नफ्यातfile photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'दूरसंचार क्षेत्र भारताच्या डिजिटल भविष्याला चालना देईल' हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न पूर्ण होत आहे. सरकारी मालकीची दूरसंचार सेवा कंपनी असलेली 'भारत संचार निगम लिमिटेड' (बीएसएनएल) ने तिसऱ्या तिमाहीत २६२ कोटी रूपये नफा मिळवला आहे. २००७ नंतर म्हणजेच १७ वर्षांनी बीएसएनएलचा हा पहिलाच नफा आहे.

बीएसएनएल (BSNL) ने शुक्रवारी (दि. १४) आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीची आकडेवारी जाहीर केली, ज्यामध्ये २६२ कोटींचा निव्वळ नफा झाला आहे. जवळजवळ १७ वर्षांनी बीएसएनएल कंपनी नफ्यात परतली आहे. बीएसएनएलने एकुण खर्च कमी केला आहे, ज्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत तोटा कमी झाला. शिवाय ग्राहकांची संख्या वाढवण्यासाठी विविध उपाययोजना केल्याने कंपनीला नफा मिळाला आहे. बीएसएनएलच्या मोबिलिटी सर्व्हिसेसच्या महसुलात १५ टक्क्यांनी वाढ झाली. फायबर-टू-द-होम (एफटीटीएच) महसुलातही १८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर लीज्ड लाईन सर्व्हिसेसच्या महसुलात गेल्या आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीच्या तुलनेत १४ टक्क्यांची वाढ नोंदवली आहे.

बीएसएनएलसाठी टर्निंग पॉइंट : ज्योतिरादित्य शिंदे

केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे म्हणाले की, आजचा दिवस भारताच्या दूरसंचार क्षेत्रासाठी खूप महत्त्वाचा आहे. पंतप्रधान मोदींचे स्वप्न आहे की दूरसंचार क्षेत्र भारताच्या डिजिटल भविष्याला चालना देईल. आमचे सर्व दूरसंचार सेवा प्रदाते या दिशेने पूर्ण दृढनिश्चयाने काम करत आहेत. हे लक्ष्य साध्य करण्याच्या दिशेने, बीएसएनएलने २०२४-२५ या आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत १७ वर्षांत प्रथमच तिमाही नफा नोंदवला आहे. बीएसएनएलने तिमाहीत २६२ कोटी रुपयांचा नफा कमावला आहे. बीएसएनएलची तिमाही कामगिरी कंपनीसाठी 'टर्निंग पॉइंट' आहे. कंपनीने सेवा, ऑफर आणि ग्राहक वाढविण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. बीएसएनएलने अनेक बाबींमध्ये सुधारणा केली आहे, गतिशीलता, एफटीटीएच आणि लीज्ड लाइन सेवा ऑफरमध्ये जवळजवळ १४-१८ टक्के वाढ नोंदवल्याचे त्यांनी सांगितले.

आता संपूर्ण भारतभरातील ग्राहकांना ४ जी सेवा प्रदान करण्यास सुरुवात करत आहे. १ लाख टॉवरपैकी ७५ हजार टॉवर स्थापित केले आहेत आणि सुमारे ६० हजार कार्यान्वित झाले आहेत. जूनपर्यंत सर्व १ लाख टॉवर कार्यान्वित होतील, असे मंत्री शिंदे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news