ब्रेकिंग न्‍यूज : कर्नाटकचे माजी मुख्‍यमंत्री येडियुराप्पा यांच्या अटकेला न्यायालयाकडून स्थगिती

ब्रेकिंग न्‍यूज : कर्नाटकचे माजी मुख्‍यमंत्री येडियुराप्पा यांच्या अटकेला न्यायालयाकडून स्थगिती

पुढारी ऑनलाईन डेस्क : भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांच्यावर लैंगिक छळ प्रकरणात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.  मात्र कर्नाटक उच्च न्यायालयाने शुक्रवारी 17 जूनपर्यंत अटकेपासून संरक्षण दिले आहे. येडियुराप्पा यांना १७ जूनच्या सुनावणीपूर्वी अटक करण्यात येणार नसल्याचे कर्नाटक उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांच्यावर पोक्सो गुन्ह्यात गुरुवारी (दि.१३) अजामीन अटक वॉरंट जारी करण्यात आले होते. परंतु आज झालेल्या सुनावणीवेळी पुढील सुनावणीच्या तारखेपर्यंत येडियुराप्पा यांना अटक आणि ताब्यात घेण्याची सक्तीची कार्यवाही स्थगित ठेवण्यात आली आहे, असे कर्नाटक न्यायालयाने म्हटले आहे. अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार येडियुराप्पा यांच्याविरुद्ध नोंद असून, या प्रकरणाची सीआयडी चौकशी सुरू आहे.

गुन्हा रद्द करण्यात यावा….

तथापि, येडियुराप्पा चौकशीला सहकार्य करत नसल्याने त्यांच्याविरुद्ध जलदगती न्यायालयाने वॉरंट जारी केले होते. सीआयडी अधिकार्‍यांनी येडियुराप्पांना चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस बुधवारी (दि.१२) बजावली होती. पण येडियुराप्पांनी तत्काळ हजर राहण्यास नकार दिला. आपल्याविरुद्धचा गुन्हा रद्द करण्यात यावा, अशी याचिकाही त्यांनी उच्च न्यायालयात केली आहे.

येडियुराप्पांवर कोणते आरोप आहेत?

फेब्रुवारी महिन्यात एक महिला आपल्या अल्पवयीन मुलीसह येडियुराप्पांच्या बंगल्यावर मदत मागण्यासाठी गेली होती. त्यावेळी येडियुराप्पांनी हॉलमध्ये आधी दोघींशी चर्चा केली. त्यानंतर मुलीशी स्वतंत्र चर्चा करायची आहे, असे सांगून ते मुलीला स्वतंत्र खोलीत घेऊन गेले. 12 ते 15 मिनिटांनंतर ते बाहेर आले. त्यानंतर मुलीने येडियुराप्पा यांनी आपल्यावर अत्याचार केल्याचे आईला सांगितले. त्यानुसार गेल्या 3 मार्च रोजी येडियुराप्पांविरुद्ध अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news