

पुढारी ऑनलाईन डेस्क : झारखंड येथे १३ व २० नोव्हेंबरला विधानसभेसाठी मतदान होत आहे. भाजप, झामुमो, व काँग्रेस इत्यादी पक्षांचा जोरदार प्रचार सुरु आहे. अनेक सभा, प्रचार रॅली, रोड शो यांनी प्रचाराचा धडाका उडाला आहे. अनेक स्टार प्रचारक येथे सभा घेत आहेत. अभिनेते मिथुन चक्रवर्ती हे मंगळवार १२ नोव्हेंबर रोजी धनबाद जिल्ह्यातील निरसा विधानसभा मतदारसंघात भाजपा उमेदवार अपर्णा सेनगुप्ता यांच्या प्रचारसभेला आले होते. यावेळी त्यांना पाहण्यासाठी गर्दी उडाली होती याचाच फायदा घेत पाकीटमारांनी चक्क मिथुनदांचे पाकीट मारले.
या कार्यक्रमावेळी सुरक्षा यंत्रणा खुपच तोकडी होती. त्यात मिथुन चक्रवर्ती यांना पाहण्यासाठी हजारो लोक जमले होते. या गर्दीला आवरायला पोलिस नव्हते. मिथून यांच्या बरोबर सेल्फी घेण्यासाठी लोक त्यांच्या जवळ येत होते. याचा फायदा घेत चोरट्यांनी मिथुन चक्रवर्ती यांचेच पाकीट मारले. ही बाब समजताच उपस्थित नेते मंडळीची चांगलीच भंबेरी उडाली.
यानंतर व्यासपीठावर नेते मंडळींनी याची माईकवरुन घोषणा सुरु केली. कोणी त्यांचे पाकिट मारले असेल त्याने ते परत करावे असे आवाहन करण्यात आले. पण कोणीही ते प्रामाणिकपणे परत दिले नाही. त्यानंतर सभास्थळावरून मिथुनदा यांनी कार्यक्रम लवकर आटोपून काढता पाय घेतला. पण या घटनेची चांगलीच चर्चा झाली.