

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा; भाजप आमदार रेखा गुप्ता यांनी आज गुरुवारी (दि.२०) दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. रामलीला मैदानावर हा शपथविधी (Delhi CM Oath Ceremony) सोहळा झाला. त्यांना दिल्लीचे नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांनी पद आणि गोपनियतेची शपथ दिली. रेखा गुप्ता ह्या एकमेव महिला भाजप नेत्या आहेत; ज्यांना मुख्यमंत्रीपदी संधी देण्यात आली आहे. त्या दिल्लीच्या चौथ्या महिला मुख्यमंत्री बनल्या आहेत. तर सुषमा स्वराज यांच्यानंतर बनलेल्या भाजपच्या दुसऱ्या महिला मुख्यमंत्री आहेत.
यावेळी प्रवेश साहिब सिंह वर्मा, आशिष सूद, मनजिंदर सिंग सिरसा, रविंदर इंद्रराज सिंह, कपिल मिश्रा, पकंज कुमार सिंह यांनी मंत्रीपदी शपथ घेतली.
दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी गुरुवारी रामलीला मैदानावर पार पडला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, विविध केंद्रीय मंत्री आणि एनडीएशासित राज्यांचे मुख्यमंत्री या शपथविधी सोहळ्यावेळी उपस्थित होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, केंद्रीय मंत्री धमेंद्र प्रधान, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव, राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी, बिहारचे उपमुख्यमंत्री विजय कुमार सिन्हा, राजस्थानचे उपमुख्यमंत्री प्रेमचंद बैरवा यांचीही उपस्थिती होती.
शपथविधीनंतर 'शीशमहल'मध्ये राहणार का? असे विचारले असता, दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी, 'नाही' असे उत्तर दिले.
बुधवारी रात्री भाजपने नायब राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा सादर केला. तत्पुर्वी भाजपच्या विधिमंडळ पक्षाची बैठक बुधवारी पार पडली. या बैठकीत रेखा गुप्ता यांच्या नावावर विधीमंडळ नेता म्हणून शिक्कामोर्तब झाले. पक्षाच्या वतीने माजी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद आणि पक्षाचे राष्ट्रीय सचिव ओमप्रकाश धनकड यांना विधिमंडळ नेता निवडीसाठी केंद्रीय निरीक्षक म्हणून नियुक्त केले होते.
मुख्यमंत्री म्हणून नावाची घोषणा झाल्यानंतर रेखा गुप्ता म्हणाल्या, "मला ही संधी दिल्याबद्दल पीएम मोदी, भाजप पक्षश्रेष्ठी आणि दिल्लीच्या जनतेचे आभार मानते. २७ वर्षांनंतर एका नवीन अध्यायाची सुरुवात होत आहे. आपल्या देशातील महिलांसाठी हा अभिमानाचा क्षण आहे. भाजपची प्रत्येक वचनबद्धता, ती पूर्णत्वास नेणे हे माझ्या आयुष्याचे अंतिम ध्येय आहे."
रेखा गुप्ता दिल्लीतील शालीमार बाग विधानसभा क्षेत्राच्या आमदार आहेत. तिसऱ्यांदा त्या आमदार म्हणून निवडून आल्या आहेत. विद्यार्थी दशेपासून रेखा गुप्ता राजकारणात सक्रिय आहेत. वकिलीचे शिक्षण घेतलेल्या रेखा गुप्ता दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघाच्याही अध्यक्षा राहिल्या आहेत. २००३ मध्ये त्या युवा मोर्चामध्ये दिल्ली राज्याचया सचिव होत्या. पुढे भाजप युवा मोर्चामध्ये त्यांनी राष्ट्रीय स्तरावर काम केले. भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतही त्यांनी काम केले. दिल्लीच्या महापौर म्हणूनही त्यांनी काम केले.
रेखा गुप्ता या दिल्लीच्या चौथ्या मुख्यमंत्री बनल्या आहेत. यापूर्वी काँग्रेस नेत्या शीला दीक्षित, भाजप नेत्या सुषमा स्वराज तर आप नेत्या आतिशी यांनी मुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली. या तिन्ही मुख्यमंत्र्यांमध्ये सर्वाधिक १५ वर्षांचा कार्यकाळ शीला दीक्षित यांचा राहिला. सुषमा स्वराज यांचा कार्यकाळ केवळ ५२ दिवसांचा तर आतिशी यांचा कार्यकाळ ४ महिने आणि काही दिवसांचा राहिला. शीला दीक्षित, सुषमा स्वराज, आतिशी यांच्यानंतर रेखा गुप्ता दिल्लीच्या चौथ्या महिला मुख्यमंत्री झाल्या आहेत.
विजेंदर गुप्ता दिल्ली विधानसभेचे अध्यक्ष होण्याची शक्यता आहे. तर मोहन सिंह बिष्ट उपाध्यक्ष होतील, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.