

दिल्ली विधानसभा निवडणुकीत (Delhi Election Result) आम आदमी पक्षाला (AAP) मोठा धक्का बसला. तर २७ वर्षांचा राजकीय दुष्काळ दूर करून भाजप (BJP) सत्तेत आला आहे. भाजपने ४७ जागांवर बहुमतांची आघाडी आहे. तर आप २३ जागांवर आघाडीवर राहिला. कुठल्या कारणांमुळे भाजपला हा विजय सोपा झाला आणि आम आदमी पक्षाला पराभव पत्करावा लागला, यावर नजर टाकली तर काही प्रमुख बाबी अधोरेखित होतात.
इंडिया आघाडीमध्ये आम आदमी पक्ष आणि काँग्रेस एकसंघ नसल्याचा मोठा फटका आपला बसला. दिल्लीमध्ये लोकसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेस आणि आम आदमी पक्षाने एकत्रित निवडणूक लढवली होती. तेव्हा सन्मानजनक मतदानाची टक्केवारी मिळाली होती. मात्र, विधानसभा निवडणूक ही वेगवेगळी लढवली आणि दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी एकमेकांवर गंभीर आरोप प्रत्यारोप केले. दुसरीकडे अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्यासह अरविंद केजरीवाल यांच्या टीममधील प्रमुख नेत्यांना तुरुंगात जावे लागले. केवळ अरविंद केजरीवाल नव्हे तर अरविंद केजरीवालांच्या मंत्रिमंडळातील प्रमुख चेहऱ्यांना तुरुंगात जावे लागले. मद्यधोरण गैरव्यवहार प्रकरण केजरीवालांना चांगलेच भोवले. सोबतच भाजपच्या सूक्ष्म नियोजनाचा पत्ताच आम आदमी पक्षाला लागला नाही.
दुसरीकडे भाजपने सगळ्याच निवडणुकांप्रमाणे अत्यंत सूक्ष्म नियोजन या निवडणुकीचे केले होते. दिल्लीत देशाच्या सर्व भागातील लोक राहतात. या सर्व भागातील मतदाराला आकर्षित करण्यासाठी देशाच्या सर्व भागातून नेतेमंडळी भाजपने दिल्लीत बोलावली. या सगळ्या नेत्यांनी दिल्लीतील मतदारांशी संवाद साधला. राज्यात आणि केंद्रात एकच सरकार असल्यास विकास गतीने होऊ शकतो, ही भावना रुजवण्यासाठी घरोघरी जाऊन संवाद साधला. छोट्या छोट्या बैठका घेतल्या, याचा फायदा भाजपाला झाला. अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या संपूर्ण टीमवर पद्धतशीरपणे नियोजनबद्ध हल्ले चढवण्यात आले, अरविंद केजरीवाल यांचे शीशमहल अथवा मद्यधोरण गैरव्यवहार प्रकरण अशी एक एक प्रकरणे आम आदमी पक्षाच्या विरुद्ध भाजपने पद्धतशीरपणे समोर आणली. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ज्या योजना आम आदमी पक्षाच्या होत्या त्या योजना आम्ही बंद करणार नाही, त्या सुरूच ठेवून त्यासोबत आणखी चांगल्या योजना दिल्लीकरांना देऊ असे भाजपने म्हटले होते. या सगळ्या गोष्टी अरविंद केजरीवालांच्या विरुद्ध गेल्याचे निकालातून दिसून येते.