

पुढारी ऑनलाईन डेस्क: Delhi Election Results 2025 |"राजकारणात आरोप प्रत्यारोप होत असतात. आरोप होत असतील तर ते कसे खोटे आहेत, ते जनतेसमोर मांडावे लागतात". असे मत भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाचे प्रमुख, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केले आहे. दिल्ली विधानसभा निकालावर त्यांनी आज (दि.८) वृत्तवाहिनीशी बोलताना प्रतिक्रिया दिली.
माध्यमांशी बोलताना अण्णा हजारे म्हणाले, "सत्य नेहमी सत्य असते, खोटे हे खोटेच असते. आपची दिल्लीत पक्ष काढण्यावर एक बैठक झाली. सुरूवातीपासूनच मी या विचारापासून दूर राहिलो. पण अरविंद केजरीवाल यांनी यामध्ये स्वार्थीपणा केला". पुढे दारू घोटाळ्यामुळे आपचा पराभव झाला, आपने जनतेचा विश्वास गमावला आहे. राजकारणात आचार, विचार महत्त्वाचे आहेत हे आम आदमी पार्टीचे नेते विसरले, असेही ते म्हणाले.
"मी नेहमीच म्हटले आहे की उमेदवाराचे आचरण, विचार शुद्ध असले पाहिजेत. जीवन दोषरहित असले पाहिजे आणि त्याग असावा. हे गुण मतदारांना उमेदवारावर विश्वास ठेवण्यास भाग पाडतात. मी हे अरविंद केजरीवाल यांना सांगितले पण त्यांनी त्याकडे लक्ष दिले नाही आणि शेवटी, त्यांनी दारूवर लक्ष केंद्रित केले. ते पैशाच्या ताकदीने भारावून गेले होते", अशी टीकादेखील अण्णा हजारे यांनी केली.