

पुढारी ऑनलाईन डेस्क : दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी (Delhi Election 2025) आज शनिवारी (दि.४) भाजपने (BJP) २९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून आपचे संयोजक आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्याविरोधात प्रवेश वर्मा निवडणूक लढवणार आहे. भाजपने करोलबागमधून दुष्यंत गौतम, राजौरी गार्डन येथून मनजिंदर सिंग सिरसा, बिजवासन येथून कैलाश गेहलोत आणि गांधी नगरमधून अरविंदर सिंह लव्हली यांना निवडणूक रिंगणात उतरवले आहे.
तसेच भाजपचे दिग्गज नेते रमेश बिधूडी कालकाजी येथून दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांच्या विरोधात निवडणूक लढवणार आहेत. आम आदमी पक्ष सोडून भाजपमध्ये दाखल झालेले कैलाश गेहलोत यांना पक्षाने बिजसावन येथून तिकीट दिले आहे.
भाजपने प्रवेश वर्मा यांना तिकीट दिल्याने हाय- प्रोफाईल नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघात चुरशीचा सामना होण्याची शक्यता आहे. काँग्रेसने याच जागेवर दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचा मुलगा संदीप दीक्षित यांना मैदानात उतरवले आहे. यामुळे येथे केजरीवाल, प्रवेश वर्मा आणि संदीप दीक्षित असा तिहेरी लढत होणार आहे.
याआधी आपने दिल्लीतील सर्व ७० जागांवर उमेदवारांची घोषणा केली आहे. काँग्रेसनेही काही जागांवर उमेदवारी दिली आहे. आता भाजपने २९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, निवडणूक आयोग लवकरच दिल्ली विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर करु शकते. ही निवडणूक फेब्रुवारीच्या सुरुवातीला होण्याची शक्यता आहे. दिल्लीत गेल्या १० वर्षांपासून आपचे सरकार सत्तेत आहे. यावेळी 'आप'ला हरवून आम्ही दिल्लीत सत्ता मिळवू, असा दावा भाजपने केला आहे.