

पुढारी ऑनलाईन डेस्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते आज शनिवारी (दि.४ जानेवारी २०२५) भारत मंडपम येथे आयोजित ग्रामीण भारत महोत्सवाचे (Grameen Bharat Mahotsav 2025) उद्घाटन झाले. यावेळी पीएम मोदी यांनी ग्रामीण भारत महोत्सवात सहभागी झालेल्या कारागिरांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी संबोधित केले. ''२०१४ पासून, मी सातत्याने आणि प्रत्येक क्षण ग्रामीण भारताच्या सेवेत कार्यरत आहे. गावातील लोकांना सन्मानाचे जीवन देणे हे आमच्या सरकारचे प्राधान्य आहे. गावातील लोक सशक्त व्हावेत. त्यांना गावातच पुढे जाण्यासाठी अधिकाधिक संधी मिळाव्यात. त्यांना गावातून स्थलांतरित व्हावे लागू नये, गावातील लोकांचे जीवन सुसह्य व्हावे, हा आमचा उद्देश आहे. म्हणून आम्ही गावागावांत मूलभूत सुविधांची गॅरंटी देण्याची मोहीम आम्ही सुरू केली.'' असे पीएम मोदी म्हणाले.
पूर्वीच्या सरकारांनी एससी-एसटी-ओबीसींच्या गरजांकडे दुर्लक्ष केले. यामुळे गावांतून स्थलांतर होत राहिली. गरिबी वाढत गेली आणि गाव आणि शहर यांच्यातील दरी वाढत गेली. ज्यांची कोणी विचारपूस केली नाही, अशा लोकांची मोदी पूजा करतात. जे भाग अनेक दशके विकासापासून वंचित राहिले; त्यांना आता समान हक्क मिळत आहेत, असेही त्यांनी सांगितले.
पीएम मोदी म्हणाले, "लाखो गावांतील प्रत्येक घरी आज शुद्ध पिण्याचे पाणी पोहोचत आहे. आज लोकांना १.५ लाखांहून अधिक आयुष्मान आरोग्य मंदिरांमध्ये आरोग्य सेवांचा लाभ घेण्यासाठी चांगले पर्याय मिळत आहेत. डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आम्ही देशातील सर्वोत्कृष्ट डॉक्टर आणि रुग्णालये खेड्यांशी जोडली आहेत. तसेच टेलिमेडिसिनचाही लाभ घेतला जात आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या मजबुतीसाठी गावातील प्रत्येक घटक डोळ्यासमोर ठेवून आर्थिक धोरणे बनवणे खूप महत्त्वाचे आहे. मला याचा आनंद आहे की, गेल्या १० वर्षांत आमच्या सरकारने गावातील प्रत्येक घटकासाठी विशेष धोरणे राबविली आणि निर्णय घेतले. ३ दिवसांपूर्वी मंत्रिमंडळाने पीएम फसल विमा योजना आणखी एक वर्ष सुरू ठेवण्यास मंजुरी दिली.''
ते पुढे म्हणाले, ''काही दिवसांपूर्वीच देशात एक खूप मोठा सर्व्हे करण्यात आला होता. आणि या सर्वेक्षणातून अनेक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. २०११ च्या तुलनेत आता देशातील गावातील लोकांची क्रयशक्ती (purchasing power) जवळपास ३ पटीने वाढली आहे. म्हणजेच पूर्वीपेक्षा गावातील लोक अधिक खर्च करत आहेत. यापूर्वी अशी परिस्थिती होती की गावातील लोकांना त्यांच्या कमाईतील ५० टक्केपेक्षा जास्त खर्च अन्नावर करावा लागत होता. पण स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच असे घडले आहे की ग्रामीण भागातही अन्नावरील खर्च ५० टक्के कमी झाला आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी खर्च करण्याची क्षमता वाढली आहे." असे पीएम मोदी यांनी सांगितले.
सर्वेक्षणातून आणखी एक महत्त्वाची गोष्ट समोर आली आहे. ती म्हणजे, शहरे आणि खेड्यांमधील होत असलेला वापर यातील तफावत कमी झाली आहे. आता हळूहळू ग्रामीण लोकही शहरी लोकांची बरोबरी करु लागले आहेत. आमच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे आज जेव्हा मी ज्या यशोगाथा पाहतो तेव्हा मला असे वाटते की हे सर्व काम होऊ शकते. ही सर्व कामे पूर्वीच्या सरकारांनाही करता आली असती, असे मला वाटते. त्यासाठी त्यांना मोदी येण्याची वाट पहावी लागली. तोपर्यंत देशातील लाखो गावे अनेक दशके मूलभूत गरजांपासून वंचित राहिली, असेही त्यांनी नमूद केले.
कालच स्टेट बँक ऑफ इंडियाचा रिपोर्ट समोर आला आहे. त्यानुसार २०१२ मध्ये भारतातील ग्रामीण भागातील गरिबीचे प्रमाण २६ टक्के होते. ते २०२४ मध्ये ग्रामीण भारतातील गरिबी ५ टक्क्यांपेक्षा कमी झाली आहे, असेही पीएम मोदी म्हणाले.