

मुंबई : पुढारी वृत्तसेवा
भाजपने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून संघटनात्मक बदलांना सुरुवात केली आहे. त्यासाठी, २० एप्रिल रोजी भाजपच्या राज्यातील सर्व म्हणजे १ हजार १९६ - मंडल अध्यक्षांची निरीक्षकांच्या देखरेखीत निवडणूक होणार आहे. मंडल अध्यक्षांच्या निवडीनंतर २२ एप्रिलपासून नवीन जिल्हा अध्यक्षांची निवड प्रक्रिया सुरू होणार आहे, अशी माहिती प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी शुक्रवारी दिली.
भाजपने संघटनात्मक बांधणीसाठी संघटन पर्व हाती घेतले आहे. या संघटन पर्वाचा आढावा भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंह यांच्या उपस्थितीत घेण्यात आला. त्यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना चव्हाण यांनी जिल्हाध्यक्ष आणि मंडल अध्यक्षांच्या निवडीबाबत माहिती दिली. संघटन पर्वाअंतर्गत भाजपचे दीड कोटींहून अधिक प्राथमिक सदस्य आणि १ लाख ३४ हजारांहून अधिक सक्रिय सदस्यांच्या नोंदणीचे विक्रमी उद्दिष्ट साध्य करून महाराष्ट्र भाजपचे सदस्य नोंदणी अभियान ऐतिहासिक ठरल्याचे अरुण सिंह यावेळी म्हणाले.