

BJP MP Nishikant Dubey on Raj Thackeray
गुवाहाटी (आसाम) : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या हिंदी भाषिकांविरोधातील वादग्रस्त वक्तव्याला आता राजकीय वळण लागले आहे. राज ठाकरे यांनी अलीकडेच शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसोबत झालेल्या विजयी मेळाव्यात हिंदी भाषिकांवर टीका केली होती. ते म्हणाले होते की, "मारा, पण व्हिडीओ काढू नका."
त्यांच्या या विधानावरून देशभरातून टीका होत असतानाच आता भाजपचे झारखंडमधील खासदार निशिकांत दुबे यांनी थेट प्रत्युत्तर देत कठोर भाषेत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.
आमच्या पैशांवर जगताय, हिंमत असेल तर बाहेर या, आपटून आपटून मारू, असं वादग्रस्त वक्तव्य खा. दुबे यांनी केलं आहे.
गुवाहाटीतील एका कार्यक्रमात बोलताना निशिकांत दुबे म्हणाले की, "मराठी बोलायला लागेल म्हणजे काय? महाराष्ट्रात टाटा, बिर्ला, अंबानी आहेत. तुम्ही मराठी लोकं आमच्या पैशावर जगता. तुमच्याकडे कोणते उद्योगधंदे आहेत? तुम्ही कुठले कर भरता? खाणी आमच्याकडे आहेत. झारखंड, छत्तीसगड, ओडिशा, उत्तरप्रदेशमध्ये आहेत. तुमच्याकडे (महाराष्ट्रात) कोणत्या खाणी आहेत?
रिलायन्सची रिफायनरी गुजरातमध्ये आहे. सेमी कंडक्टर इंडस्ट्री गुजरातमध्ये वसत आहे. तुम्ही आमचे शोषण करत आहात. तुम्ही हिंदी भाषिकांना मारता. जर हिंमत असेल, आणि हिंदी बोलणाऱ्यांना मारायचंच असेल, तर मग उर्दू, तमिळ आणि तेलुगू बोलणाऱ्यांनाही मारा.
एवढेच धाडसी असाल, स्वतःला मोठे बॉस समजत असाल तर महाराष्ट्राच्या बाहेर या. बिहार, उत्तर प्रदेश, तामिळनाडूमध्ये या. तुम्हाला आपटून आपटून मारू.
ते पुढे म्हणाले, "ही अराजकता चालणार नाही. आम्ही मराठी भाषेचा सन्मान करतो मराठी आदरणीय भाषा आहे. आणि महाराष्ट्रातील स्वातंत्र्यसैनिकांचा आम्ही आदर करतो. शिवाजी महाराज, शाहू महाराज, पेशवे, तात्या टोपेंपासून सर्वांचा आम्ही सन्मान करतो. टिळक, गोखले यांचे तसेच महाराष्ट्राचे स्वातंत्र्यलढ्यात मोठे योगदान आहे.
पण आता व्होट बँकेचे राजकारण होत आहे. मुंबई महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राज आणि उद्धव ठाकरे हलक्या पद्धतीचे राजकारण करत आहेत. हे अत्यंत हीन राजकारण आहे. आम्ही त्यांचा विरोध करतो.
जर त्यांच्यात खरोखरच हिंमत असेल, तर मुंबईतच बाजूलाच माहिम दर्ग्याजवळ जा आणि तिथे हिंदी किंवा उर्दू बोलणाऱ्यांना मारून दाखवा. तरंच तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचे वारसदार आहात, आणि बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांवर चालत आहात, हे मी मान्य करेन."
राज ठाकरे यांचे हे विधान मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेऊन केले गेले असल्याचा आरोप भाजपने केला आहे. या विधानामुळे महाराष्ट्राच्या बाहेरच्या राज्यांमध्ये असंतोषाची भावना वाढत आहे. विशेषतः उत्तर भारतीय आणि दक्षिण भारतीय समुदायातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
निशिकांत दुबे यांचे वक्तव्यही अनेकांच्या भावना भडकवणारे आहे. यातून उत्तर-दक्षिण, भाषिक-प्रांतीय वादाला खतपाणी घालण्याचा धोका निर्माण झालेला आहे.
राज ठाकरे यांच्या विधानावरून सुरू झालेला वाद आता राष्ट्रीय राजकारणाच्या पटलावर पोहोचला आहे. भाषेच्या आणि प्रांताच्या नावावर राजकारण कितपत योग्य आहे, यावर आता पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. बीएमसी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुढील काही दिवस हे मुद्दे अजून तीव्र होतील, असेच संकेत मिळत आहेत.