नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीमध्ये उत्तरप्रदेश आणि महाराष्ट्रात कमी जागा मिळाल्याबद्दल भाजपमध्ये विचारमंथन सुरू आहे. त्यामुळे पक्षाच्या बैठकींनासुद्धा वेग आला आहे. दरम्यान उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ राजधानी दिल्लीत दाखल झाले असून त्यांनी सोमवारी (दि.10) भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली. उत्तरप्रदेशमधील लोकसभेच्या परिस्थितीनंतर मुख्यमंत्रीपदाची खुर्ची वाचविण्यासाठी योगी आदित्यनाथ यांचा प्रयत्न सुरु आहे.
दिल्लींमध्ये त्यांनी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. मात्र, शहा यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यामुळे त्यांचे अभिनंदन करण्यासाठी योगीनी त्यांची भेट घेतली, असे सूत्रांनी सांगितले आहे. त्यामुळे योगी-शहा यांच्या भेटीकडे औपचारिक म्हणून पाहिले जात आहे. याबरोबरच योगींनी मंत्रीपदाची शपथ घेणारे भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, नितीन गडकरी यांची देखील भेट घेतली आहे.
या सर्व नेत्यांच्या भेटी घेतल्यानंतर दिल्लीपासून लखनौपर्यंत राजकीय हालचालींना वेग आला आहे. मात्र, खुद्द योगी यांनी या भेटी केवळ औपचारिक असल्याचे म्हटले आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना शपथविधी सोहळ्यात आधीसारखा मान मिळाला नसल्याने त्यांची खुर्ची धोक्यात असल्याचा अंदाज लावला जात आहे. गेल्या आठवड्यात शनिवारी योगी यांनी मंत्रिमंडळाची बैठक बोलाविली होती. या बैठकीत उत्तरप्रदेशचे दोन्ही उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक आणि केशव प्रसाद मौर्या गैरहजर होते.
हेही वाचा :