

नवी दिल्ली : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर फोन टॅपिंगचे केलेले गंभीर आरोप भारतीय जनता पक्षाने (भाजप) शुक्रवारी स्पष्टपणे फेटाळून लावले आहेत. या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर देताना केरळम भाजपचे प्रदेशाध्यक्ष राजीव चंद्रशेखर यांनी गांधी यांच्यावर बोचरी टीका केली असून, त्यांनी आपल्या डोक्याची तपासणी करून घ्यावी, असा टोला लगावला आहे.
राहुल गांधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर व्हिडीओ शेअर करत आपला मोबाईल फोन टॅप केला जात असल्याचा आणि पंतप्रधान विदेशी शक्तींच्या प्रभावाखाली काम करत असल्याचा दावा केला होता. या आरोपांवर प्रतिक्रिया देताना राजीव चंद्रशेखर यांनी भाजपची भूमिका मांडली. चंद्रशेखर म्हणाले की, ‘राहुल गांधींना पूर्ण आदराने मी एवढेच सांगू इच्छितो की, त्यांनी आपल्या डोक्याची तपासणी करून घ्यावी. त्यांचा फोन टॅप करण्याची कोणालाही काळजी नाही आणि त्यात कोणालाही रस नाही. जर कोणाला कशात रस असेलच, तर तो या गोष्टीत आहे की, त्यांचा मेंदू दिवसेंदिवस केवळ खोट्या गोष्टींवरच कसा चालतो.’
भाजपच्या इतर नेत्यांनीही राहुल गांधींच्या भूमिकेवर टीका केली आहे. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांनीही गांधींवर निशाणा साधत, त्यांचा फोन कोणीही हॅक करण्याची गरज नसल्याचे म्हटले आहे. दुसरीकडे, राहुल गांधी यांनी पंतप्रधानांना दिलेल्या समोरासमोर चर्चेच्या आव्हानावर भाजपने यापूर्वीच आपली भूमिका स्पष्ट केली आहे. रस्त्यावर राजकीय चर्चा करण्याऐवजी राहुल गांधींनी आपले सर्व आरोप आणि मुद्दे संसदेत मांडावेत आणि तिथे चर्चा करावी, असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले आहे.