

नवी दिल्ली : ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारतीय वायु दलाचे किती नुकसान झाले, असा प्रश्न उपस्थित करून राहुल गांधी सैन्याचे मनोबल कमी करतात, अशी टीका भाजपने केली. दरम्यान, पुन्हा एकदा भाजपने राहुल गांधींना 'निशाण-ए-पाकिस्तान' संबोधले.
भाजप प्रवक्ते गौरव भाटिया यांनी शुक्रवारी पक्ष मुख्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी राहुल गांधींवर जोरदार टीका केली. भाटिया म्हणाले की, "ऑपरेशन सिंदूरबाबत राहुल गांधी काहीही विधाने करत आहेत. ते विचारत आहेत की भारतीय वायु दलाचे किती नुकसान झाले. ११ मे रोजी पत्रकार परिषदेत एअर मार्शल भारती म्हणाले की, 'आपण युद्धाच्या परिस्थितीत आहोत, त्या प्रश्नाचे उत्तर देणे आपल्यासाठी शहाणपणाचे नाही', मात्र तरीही राहुल गांधी भारतीय सैन्याचे मनोबल कसे कमकुवत करायचे यावर चर्चा करण्यात व्यस्त असल्याचे दिसते, अशीही टीका केली.
गौरव भाटिया म्हणाले की, पाकिस्तानच्या वरिष्ठ नेत्या मरियम नवाज यांनी वक्तव्य केले की ६ आणि ७ मे रोजी रात्री आणि ९ मे रोजी भारताच्या कारवाईमुळे पाकिस्तानला मोठे नुकसान सहन करावे लागले. पाकिस्तानातील नेते भारताने केलेली कारवाई मोठी मानत असताना राहुल गांधी मात्र चुकीचे प्रश्न उपस्थित करतात, असेही ते म्हणाले.
दरम्यान, राहुल गांधींनी १७ मे रोजी परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचा एक व्हिडिओ शेअर केला होता ज्यामध्ये ते म्हणाले होते की "ऑपरेशनच्या सुरुवातीला आम्ही पाकिस्तानला संदेश पाठवला होता की आम्ही दहशतवादी तळांवर हल्ला करत आहोत, पाकिस्तानी नागरिक किंवा पाकिस्तानी लष्करावर नाही. त्यामुळे लष्कराकडे या प्रक्रियेत हस्तक्षेप न करण्याचा आणि वेगळे राहण्याचा पर्याय आहे. त्यांनी चांगला सल्ला न घेण्याचा पर्याय निवडला." त्यानंतर पुन्हा एकदा राहुल गांधींनी परराष्ट्रमंत्र्यांवर हल्ला चढवत "हल्ल्याच्या सुरुवातीला पाकिस्तानला माहिती देणे हा गुन्हा होता. परराष्ट्रमंत्री यांनी सार्वजनिकरित्या कबूल केले आहे की भारताने हे केले. त्याला कोणी परवानगी दिली? परिणामी आपल्या हवाई दलाने किती विमाने गमावली?” असा प्रश्न विचारला होता.