

नागपूर : राजेंद्र उट्टलवार
काँग्रेसचे नेते, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आरक्षण संदर्भात व्यक्त केलेली भूमिका ही त्यांची तीन पिढ्यांची मानसिकताच स्पष्ट करणारी आहे असा आरोप करतानाच ओबीसी, एससी, एसटी आरक्षण संदर्भात त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी तोवर त्यांच्या प्रचारसभांवर या समाजाने सामाजिक बहिष्कार घालावा, तोवर राज्यात पाय ठेऊ नये प्रसंगी आम्हाला अटक झाली तरी चालेल भाजप त्यांना विरोध करणारच असा इशारा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज माध्यमांशी बोलताना दिला. केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 100 दिवसातील कारकिर्दीत 122 योजनांच्या प्रगतीचा लेखाजोखा त्यांनी या निमित्ताने मांडला.
राहुल गांधी यांची जीभ छाटणे किंवा जिभेला चटके देणे या संदर्भात आमदार संजय गायकवाड, खासदार डॉ अनिल बोंडे यांच्या वक्तव्याचे समर्थन करणार नाही, पण राहुल गांधींनी देखील सांभाळून बोलावे असे त्यांनी स्पष्ट केले. राहुल गांधींच्या जीवाला धोका असल्या संदर्भात व्यक्त होत असलेल्या प्रतिक्रियांवर बोलताना बावनकुळे यांनी त्यांच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकार सक्षम आहे असा दावा केला. पं. जवाहरलाल नेहरू, राजीव गांधी आणि आता राहुल गांधी यांनी नेहमीच डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा विरोध केला. राजीव गांधींनी बुद्धीहीनांना आरक्षण अशी भाषा वापरली, तर आता राहुल गांधी यांनी देखील अमेरिकेत जाऊन आरक्षणविरोधी वक्तव्य केले.
राज्यात राहुल गांधी जेव्हा येतील तेव्हा ओबीसी, दलित समाज त्यांच्या मंचावर जाऊन यासंबंधी भूमिका स्पष्ट करण्याचा सवाल उपस्थित करतील. आरक्षण संदर्भात भूमिका स्पष्ट करा तेव्हाच महाराष्ट्रात पाय ठेवा असे आव्हानही भाजप प्रदेशाध्यक्षांनी यावेळी दिले. दरम्यान, रामदास आठवले यांनी पासपोर्ट रद्द करण्याच्या व्यक्त केलेल्या भूमिकेवर बोलताना आठवले यांनी विचारपूर्वकच हे वक्तव्य केले असेल या शब्दात बावनकुळे यांनी समर्थन केले. परदेशात जाऊन देशाची बदनामी करणाऱ्यांनी वेळेत सावध व्हावे हा इशारा यातून आहे.
काँग्रेस नेत्यांनी काँग्रेसचा आरक्षणाला असणारा विरोध या निमित्ताने पोटातून ओठावर आला. दलितांविषयी कळवळा असणारे मल्लिकार्जुन खर्गे किंवा ओबीसी विषयी पोटतिडकीने बोलणारे नाना पटोले यांनी आता आपली भूमिका स्पष्ट करावी असे आव्हान दिले. दरम्यान, राज्यातील लाडकी बहीण योजनेमुळे अर्थव्यवस्थेला बळ मिळेल, हा पैसा पुन्हा बाजारातच येणार आहे असा दावा करतानाच करदात्यांनी याबाबतीत उगीच भीती बाळगू नये असे एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले.
लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी विकसित भारतापेक्षा जनतेला आरक्षण, संविधान अशा मुद्द्यांवर नरेटीव्ह सेट करीत संभ्रमीत केले, आता अशी चूक लोकांकडून होणार नाही. विधानसभा निवडणुकीत डबल इंजिनच्या सरकारला ते कौल देतील. 14 कोटी जनतेचे कल्याण हाच आमचा अजेंडा आहे. आदिवासींनी संभ्रमात राहू नये. 86 हजार कोटींच्या योजना त्यांच्यासाठी आम्ही दिल्या. संभ्रमातील लोकांची आम्ही निश्चितच समजूत घालू, काँग्रेसने केलेला खोटारडेपणा आम्ही पुसून काढू असा दावा बावनकुळे यांनी यावेळी केला. या प्रसंगी जिल्हा भाजपचे अध्यक्ष सुधाकर कोहळे, शहराध्यक्ष बंटी कुकडे, चरणसिंग ठाकूर, अरविंद गजभिये, अशोक धोटे, रमेश मानकर प्रवक्ते चंदन गोस्वामी आदी उपस्थित होते.