

Bihar Paras Hospital firing incident Chandan Mishra Death
पाटणा : गँग्स ऑफ वासेपूर सिनेमा आठवतोय... दिवसाढवळ्या घरात घुसून किंवा कार्यालयात घुसून गोळीबार केल्याचे सीन तुम्ही पाहिला असेल... सिनेमात दिसणारा हा प्रसंग बिहारमध्ये प्रत्यक्षात घडलाय आणि गोळीबाराची ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. पॅरोलवर बाहेर आलेल्या गुंडाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आलीये. बिहारमध्ये गुंडाराज सुरू असून राष्ट्रपती राजवट लागू करा, अशी मागणी विरोधक करत आहेत.
चंदन मिश्रा हा गुंड नुकताच पॅरोलवर सुटला होता. चंदनवर हत्या, खंडणी असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल होते. 2011 मध्ये बक्सर येथील व्यावसायिक राजेंद्र केसरींची हत्या करण्यात आली होती. या हत्येप्रकरणी चंदन आणि त्याचा साथीदार शेरू सिंह या दोघांना न्यायालयाने दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. चंदन गेल्या 12 वर्षांपासून पाटणातील कारागृहात शिक्षा भोगत असून काही दिवसांपूर्वी तो उपचारासाठी पॅरोलवर सुटला होता. 18 जुलैला त्याच्या पॅरोलचा कालावधी संपणार होता.
चंदनवर पाटण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. संबंधित रुग्णालय हे पाटण्यातील प्रतिष्ठित रुग्णालयपैकी एक असून रुग्णालयात प्रवेश करताना सुरक्षा रक्षकांकडून तपासणीही केली जाते.
अशा कडेकोट सुरक्षा व्यवस्थेला भेदून गुरुवारी दुपारी पाच तरुण रुग्णालयात गेले. चंदन मिश्रावर ज्या खोलीत उपचार सुरू होते त्या खोलीत घुसून त्याच्यावर गोळ्या झाडल्या आणि काही मिनिटातच तिथून पळाले.
हल्लेखोर चंदनच्या खोलीत घुसताना आणि बाहेर पडतानाचे दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. टोळीयुद्धातूनत चंदनची हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
ज्याच्यासोबतीने व्यावसायिकांची हत्या केली त्यानेच घेतला चंदनचा जीव
चंदन आणि शेरू हे आधी साथीदार होते. कालांतराने त्यांच्यात मतभेद झाले आणि शेरू टोळीतून बाहेर पडला. शेरूच्या टोळीतील शूटर्सनीच चंदनची हत्या केली असावी, असे प्राथमिक तपासातून समोर आले आहे.
बिहारमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करा
पूर्णियाचे अपक्ष खासदार पप्पू यादव यांनी बिहारमध्ये अराजकता पसरली असून कोणीही सुरक्षित नाही, असा दावा केला आहे. हॉस्पिटलच्या बाजूला पोलीस ठाणे तर 200 मीटरवर पोलीस मुख्यालय आणि इतक्या मोक्याच्या ठिकाणी असलेल्या हॉस्पिटलमध्ये दिवसाढवळ्या हत्या केली जाते यातूनच कायदा- सुरक्षेची अवस्था दिसते. बिहारमध्ये सरकार अस्तित्वातच नसून राज्यपालांनी तातडीने राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी पप्पू यादव यांनी केली आहे.