

Bihar Elections Campaign Ends
प्रशांत वाघाये
नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीसाठी मागील काही दिवसांपासून धडाडणाऱ्या प्रचार तोफा रविवारी थंडावल्या. राज्यातील विधानसभेच्या जागांसाठी मंगळवारी मतदान होणार आहे. त्यापार्श्वभूमीवर प्रचाराच्या अंतिम दिवशी सत्ताधारी एनडीएसह प्रमुख विरोधी पक्ष राजद आणि काँग्रेसने कोणतीही कसर न सोडता प्रचार सभांचा धडाका लावला होता.
बिहार विधानसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यातील मतदानाला अवघे काही तास शिल्लक आहेत. तत्पूर्वी रविवारी संध्याकाळी प्रचार तोफा थंडावल्या. अखेरच्या दिवशी निवडणूक प्रचार शिगेला पोहोचला होता. एनडीएच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान मोदींनी शनिवारी शेवटची सभा घेतली आणि आता शपथविधीला भेटूया, असे सांगितले. त्यांच्या पाठोपाठ रविवारी लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी, खासदार प्रियंका गांधी यांच्यासह तेजस्वी यादव यांनी विरोधकांच्या प्रचारांच्या मोर्चा सांभाळला. दुसऱ्या टप्प्यात एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनीही आपल्या उमेदवारांसाठी पूर्ण ताकदीने प्रचार केला.
बिहार निवडणुकीच्या दोन्ही टप्प्यामध्ये एनडीएच्या प्रचाराची धुरा पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री नितीश कुमार, यांच्यासह केंद्रीय मंत्री चिराग पासवान, लल्लन सिंह यांच्या खांद्यावर होती तर विरोधकांच्या वतीने महागठबंधनसाठी राहुल गांधी, प्रियंका गांधी, तेजस्वी यादव, मुकेश सहानी यांनी प्रचार केला. राजद खासदार आणि लालू प्रसाद यादव यांच्या कन्या डॉ. मिसा भारती यांनीही महागठबंधांच्या उमेदवारांसाठी राज्यभर प्रचार केला. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे प्रकृती अस्वास्थ्यामुळे बिहार निवडणूक प्रचारात जास्त सहभागी होऊ शकले नाही. दुसरीकडे असदुद्दीन ओवेसी, तेजप्रताप यादव, प्रशांत किशोर यांनी आपापल्या पक्षांच्या उमेदवारांसाठी सर्वतोपरी प्रयत्न केले.
बिहार विधानसभा निवडणुकीचा दुसरा टप्पा भाजपासाठी महत्त्वाचा मानला जातो. पहिल्या टप्प्यातील जागा नितीश कुमार यांच्या जदयूच्या आणि लालूप्रसाद यादव यांच्या राजदच्या प्रभावक्षेत्रातील होत्या. तर दुसऱ्या टप्प्यातील जागा भाजपच्या प्रभाव क्षेत्रातील आहेत. त्यामुळे दुसरा टप्पा पक्ष म्हणून भाजपासाठी जास्त महत्त्वाचा आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात होणाऱ्या १२२ जागांचे गणित मनोरंजक आहे. २०२० मध्ये या १२२ जागांवर स्पर्धा जवळची होती. भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए आणि राजद - काँग्रेसच्या नेतृत्वाखालील महाआघाडीमध्ये फक्त १.६ टक्के मतांचा फरक होता. मात्र, निकाल एनडीएच्या बाजूने लागला. दरम्यान, या १२२ जागांपैकी सुमारे ५० जागा, विशेषतः मगध आणि सीमांचलमधील जागा, निवडणुकीचा एकूण निकाल निश्चित करतील. सीमांचलमध्ये एआयएमआयएमची भूमिका राजदसाठी आव्हानात्मक आहे. एनडीएला अपेक्षा आहे की मतांमध्ये विभाजन झाल्यामुळे ध्रुवीकरण होईल.
२०२० मधील बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएने या १२२ जागांपैकी ६६ जागा तर महाआघाडीने ४९ जागा जिंकल्या होत्या. एनडीएला ३८.०७% मते मिळाली होती तर महाआघाडीला ३६.४३% मते मिळाली. मतांची टक्केवारी जवळपास सारखी असली तरी विजय एनडीएचा झाला होता.
दुसऱ्या टप्प्यामध्ये बिहार सरकारमधील जवळपास नऊ मंत्र्यांचा समावेश आहे. यामध्ये सुपॉलमधून विजेंद्र प्रसाद यादव, चकाईमधून सुमित कुमार सिंह, झजारपूर मधून नितीश मिश्रा, अमरपुरमधून जयंत राज, बेतियामधून रेणूदेवी असे प्रमुख नेते आहेत. तर महागठबंधनच्या प्रमुख उमेदवारांमध्ये राजदचे ज्येष्ठ नेते आणि माजी विधानसभा अध्यक्ष उदय नारायण चौधरी, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष राजेश राम, कदवा येथून काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते शकील अहमद खान यांचा समावेश आहे.