

Kamakhya Railway Station Train coach platform drone cleaning Indian railways
नवी दिल्ली : भारतीय रेल्वे आता पारंपरिक पद्धतींपासून पुढे जाऊन, ड्रोनच्या मदतीने ट्रेन कोच आणि रेल्वे स्थानकांची स्वच्छता करत आहे. एप्रिलपासून कामाख्या रेल्वे स्थानक (आसाम) येथे या अभिनव उपक्रमाची सुरुवात झाली असून, ड्रोन्सद्वारे अशा ठिकाणी स्वच्छता केली जाते जिथे मजुरांसाठी पोहोचणे कठीण असते.
या ड्रोन स्वच्छता तंत्रज्ञानामुळे केवळ स्वच्छता कार्य अधिक प्रभावी होत नाही, तर वेळ आणि श्रम यांचीही बचत होते. हे पाऊल स्वच्छ भारत अभियान, डिजिटल इंडिया आणि स्मार्ट रेल्वे योजनेच्या दिशेने महत्त्वाचे मानले जात आहे.
रेल्वे मंत्रालयाच्या माहितीनुसार, हे ड्रोन उच्च-दाबाच्या पाण्याच्या नॉझल्ससह सुसज्ज असून, ट्रेन कोच आणि स्थानकांच्या अशा ठिकाणी स्वच्छता करतात जिथे पोहोचणे मजुरांसाठी कठीण असते. यामुळे केवळ स्वच्छता अधिक प्रभावी होतेच, पण यात मजुरांच्या सुरक्षिततेचाही विचार केला गेलेला आहे.
मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले की, "हे ड्रोन कोचेस व स्थानकांच्या अवघड भागांपर्यंत सहज पोहोचतात. स्वच्छ आणि आरोग्यदायी रेल्वेसाठी ही एक स्मार्ट झेप आहे."
याआधी या कामासाठी मजुरांची नेमणूक केली जात होती. हे काम शारीरिक दृष्ट्या कठीण व अनेक वेळा धोकादायक ठरायचे. मात्र ड्रोनमुळे आता या समस्या दूर होत आहेत.
आधुनिक भारतासाठी आधुनिक यंत्रसामग्रीची गरज
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘डिजिटल इंडिया’ व ‘मेक इन इंडिया’ या उपक्रमांच्या पार्श्वभूमीवर, भाजप नेते दिलीप घोष यांनी कामाख्या स्थानकावर ड्रोन स्वच्छतेचा व्हिडिओ शेअर करत म्हटले आहे की, "एखाद्या देशाच्या प्रगतीसाठी आधुनिक आणि प्रगत यंत्रसामग्री अत्यावश्यक असते."
भारतीय रेल्वेने याआधी 2018 मध्ये रेल्वेच्या पायाभूत सुविधांच्या देखरेखीसाठी ड्रोनचा वापर सुरू केला होता. 2020 मध्ये ‘निंजा अनमॅन्ड एरिअल व्हेईकल्स’ तयार करण्यात आले, जे रिअल टाइम ट्रॅकिंग, व्हिडिओ स्ट्रीमिंग आणि फेलसेफ मोडसह कार्यरत होते.
भारतीय रेल्वेचा हा पुढारलेला दृष्टिकोन, स्वच्छ भारत अभियानाशी सुसंगत असून, तंत्रज्ञानाचा वापर करून रेल्वेच्या कामकाजात सुधारणा करत आहे. स्वच्छता, सुरक्षा आणि कार्यक्षमता या सर्व बाबतीत ड्रोनचा वापर एक मैलाचा दगड ठरत आहे.
तंत्रज्ञानाच्या सहाय्याने भारतीय रेल्वे अधिक सुरक्षित, स्वच्छ आणि आधुनिक बनत आहे!
भारतीय रेल्वेने गेल्या काही वर्षांत प्रचंड डिजिटल व तांत्रिक प्रगती केली आहे. स्वच्छता, सुरक्षेशी संबंधित यंत्रणा, प्रवाशांचा अनुभव अधिक चांगला करणारी साधने आणि पर्यावरणपूरक उपाय यामध्ये अनेक आधुनिक तंत्रज्ञानांचा वापर सुरु आहे.
ऑनलाइन बुकिंग, मोबाईल अॅप्सद्वारे तिकिटासाठी डिजिटल तिकिटिंग आणि QR कोड्सची सुविधा उपलब्ध केली आहे. QR कोड स्कॅन करून प्लॅटफॉर्मवर किंवा कोचमध्ये एंट्री मिळेल.
GPS आधारित ट्रॅकिंग सिस्टीमद्वारे ट्रेन कुठे आहे याची रिअल टाईम माहिती प्रवाशांना मिळते. ‘Where is My Train’ आणि IRCTC अॅप्समधून सहज तपासणी करता येते.
अनेक रेल्वेंमध्ये रेल्वेत स्वयंचलित दरवाजे, बायो-वॅक्यूम टॉयलेट्स, GPS आधारित सूचना दिल्या जातात. CCTV आणि AI आधारित सुरक्षा यंत्रणा स्टेशन, कोचेसमध्ये कॅमेरे बसवले आहेत.
स्वच्छतेसाठीच नव्हे तर इन्फ्रास्ट्रक्चरची देखरेख, पुलांची तपासणी, सुरक्षा निरीक्षणासाठीही ड्रोन्सचा, ‘निंजा UAV’ (Unmanned Aerial Vehicles) वापरण्यात येत आहेत. या सर्व सुविधांमुळे रेल्वे आता हायटेक झाली आहे.