

नवी दिल्ली : भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) वाहनधारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. फास्टॅग खरेदी केल्यानंतर करावी लागणारी ‘नो युवर व्हेईकल’ (KYV) ही अनिवार्य प्रक्रिया आता संपुष्टात येणार आहे. १ फेब्रुवारी २०२६ पासून जारी होणाऱ्या सर्व फास्टॅगसाठी आता स्वतंत्र KYV करण्याची गरज भासणार नाही.
NHAI ने प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार, या सुधारणेमुळे लाखो रस्ते वापरकर्त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. वाहनधारकांकडे वैध कागदपत्रे असूनही, फास्टॅग कार्यान्वित केल्यानंतर KYV प्रक्रियेमुळे त्यांना नाहक मनस्ताप आणि विलंब सहन करावा लागत होता. नवीन निर्णयामुळे ही गैरसोय आता दूर होणार आहे.
ज्या कारधारकांकडे आधीपासूनच फास्टॅग आहेत, त्यांच्यासाठी आता नियमितपणे KYV करणे अनिवार्य राहणार नाही. प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे की, केवळ विशेष तक्रारींच्या प्रकरणांमध्येच (उदा. फास्टॅगचा गैरवापर, चुकीच्या पद्धतीने जारी करणे किंवा तांत्रिक समस्या) KYV ची आवश्यकता भासेल. अन्यथा, कोणत्याही तक्रारीशिवाय सुरू असलेल्या सध्याच्या फास्टॅगसाठी ही प्रक्रिया करण्याची गरज उरणार नाही.
फास्टॅग कार्यान्वित करण्यापूर्वी बँकांसाठी पडताळणीचे नियम अधिक कडक करण्यात आले आहेत. यासाठी NHAI ने 'वाहन' (VAHAN) डेटाबेसवर आधारित अनिवार्य पडताळणी लागू केली आहे. त्याचे मुख्य पैलू खालीलप्रमाणे आहेत :
अनिवार्य 'वाहन' पडताळणी : जोपर्यंत वाहनाचा तपशील 'वाहन' डेटाबेसशी जुळत नाही, तोपर्यंत फास्टॅग सक्रिय केला जाणार नाही.
सक्रियतेनंतर पडताळणी नाही : एकदा फास्टॅग कार्यान्वित झाला की, त्यानंतर कोणत्याही अतिरिक्त पडताळणीची गरज भासणार नाही.
RC-आधारित पडताळणी : जर वाहनाचा तपशील 'वाहन' डेटाबेसमध्ये उपलब्ध नसेल, तर बँकांना नोंदणी प्रमाणपत्राच्या (RC) आधारे तपशील तपासूनच फास्टॅग सक्रिय करावा लागेल.
ऑनलाइन फास्टॅगसाठी कडक नियम : ऑनलाइन माध्यमातून विकले जाणारे फास्टॅग देखील बँकांनी पूर्ण पडताळणी केल्यानंतरच सक्रिय केले जातील.
या नवीन निर्णयामुळे महामार्गावरील प्रवास अधिक सुलभ होणार असून तांत्रिक प्रक्रियेतील अडथळे कमी होतील. डिजिटल इंडियाच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.