पुढारी ऑनलाईन डेस्क: विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर झारखंडमध्ये मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. झारखंडचे माजी मुख्यमंत्री, झारखंड मुक्ती मोर्चाचे ज्येष्ठ नेते चंपाई सोरेन आज (दि.१८ ऑगस्ट) सकाळी दिल्लीत दाखल झाले आहेत. त्यांच्यासोबत काही आमदार असून ते भाजपमध्ये दाखल होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. दरम्यान, चंपाई सोरेन सहा आमदासांसह भाजपच्या बड्या नेत्यांच्या संपर्कात असून ते लवकरच भारतीय जनता पक्षात (BJP) सामील होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.
चंपाई सोरेन यांच्या घरावरील झारखंड मुक्ती मोर्चाचा झेंडा काढण्यात आला आहे. यामुळे ते भाजपमध्ये जाणार असल्याचे वृत्ताला पुष्टी मिळाली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चंपाई सोरेन हे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या सतत संपर्कात आहेत. हेमंत सोरेन यांना झारखंड जमीन घोटाळ्यातून दिलासा मिळाल्यानंतर चंपाई सोरेन यांना पटावरून हटवत ते पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाले होते, त्यामुळे ते नाराज असल्याचे वृत्तदेखील समोर येत आहे.
हेमंत सोरेन यांना 31 जानेवारी रोजी अंमलबजावणी संचालनालयाने कथित जमीन घोटाळ्याप्रकरणी अटक केल्यानंतर झारखंडचे विद्यमान जलसंपदा मंत्री चंपाई सोरेन यांची मुख्यमंत्रिपदावर नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर हेमंत सोरेन यांना झारखंड उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर चंपाई सोरेन यांना ३ जुलै रोजी पदावरून पायउतार व्हावे लागले होते. त्यानंतर हेमंत सोरेन यांनी पुन्हा एकदा झारखंडच्या मुख्यमंत्री पदी शपथ घेतली होती.
झारखंड मुक्ती मोर्चा (जेएमएम) च्या ज्येष्ठ नेत्याने शनिवारी भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या अफवांचे खंडन केले. हा आरोप फेटाळताना चंपाई सोरेन म्हणाले, "मला माहित नाही काय अफवा पसरवल्या जात आहेत. मला माहित नाही की कोणत्या बातम्या चालवल्या जात आहेत, त्यामुळे त्या खऱ्या आहेत की नाही हे मी सांगू शकत नाही. मला याबद्दल काहीही माहिती नाही. हम जहाँ पर हैं वही पर हैं (मी ज्या ठिकाणी आहे तिथेच आहे)".