पुढारी ऑनलाईन डेस्क : YS Jagan Mohan Reddy : आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी अडचणीत सापडले आहेत. त्यांच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याशिवाय इतर चार जणांवरही गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यात दोन आयपीएस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. टीडीपीचे आमदार रघुराम कृष्ण राजू यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सांगितले. रेड्डी यांच्याशिवाय आयपीएस अधिकारी पीव्ही सुनील कुमार, पीएसआर सीतारामजनायुलू, निवृत्त पोलीस अधिकारी आर विजय पॉल आणि गुंटूर जिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक राही जी प्रभावती यांच्या नावांचाही समावेश आहे.
पोलीसांनी सांगितले की, आमदार रघुराम कृष्णम राजू यांनी महिनाभरापूर्वी मेलद्वारे एक तक्रार पाठवली होती. त्यात त्यांनी, सीआयडी कार्यालयात बेल्ट आणि काठीने मारहाण केल्याचा आरोप केला होता. यावर कायदेशीर अभिप्राय घेण्यात आला. यानंतर गुरुवारी सायंकाळी 7 वाजता माजी मुख्यमंत्री रेड्डी आणि इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला. गुंटूर जिल्ह्यातील नागरापलेम पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आमदार राजू यांनी मेल मध्ये म्हटले आहे की, 2021 मध्ये सीआयडी अधिकाऱ्यांनी मला हैदराबाद येथून अटक केली होती. या अटकेनंतर मला स्थानिक दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले नाही आणि ट्रान्झिट अटक वॉरंट देखील घेतले नाही. पुढे मला सीआयडी कार्यालयात नेण्यात आले. तेथे माझा छळ करण्यात आला. मला मारहाण केली. त्यावेळी पीव्ही सुनील कुमार यांच्यासह अनेक पोलीस अधिकारी सीआयडी कार्यालयात उपस्थित होते. त्या सर्वांनी मला लाठ्या काठ्यांनी मारले,’ असा आरोप आमदारांनी केला आहे.
आमदार राजू पुढे म्हणतात, आंध्र प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी (वायएस जगन मोहन रेड्डी) यांच्या दबावामुळे मला हृदयविकाराशी संबंधित औषधही घेऊ दिले गेले नाही, असा आरोपही रघुराम कृष्णम राजू यांनी केला. आमदाराने दावा केला की माजी सीएम रेड्डी यांना माहित होते की माझी बायपास शस्त्रक्रिया झाली आहे. परंतु तरीही काही लोक माझ्या छातीवर बसून मला मारत होते.’
आपला फोन हिसकावून घेतला आणि पासवर्ड न सांगल्यामुळे मारहाण करण्यात आल्याचा दावाही त्याने केला आहे. पोलीस अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून सरकारी रुग्णालयात माझ्यावर उपचार करणाऱ्या डॉ. प्रभावती यांनी खोटे वैद्यकीय प्रमाणपत्र दिले. पीव्ही सुनील कुमार यांनी आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिली आणि वायएस जगन मोहन रेड्डी यांच्यावर टीका न करण्याची सूचना केल्याचा आरोपही आमदार राजू यांनी केला आहे.