

Chhatrapati Shivaji Maharaj Heritage Tour
नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने पहिल्यांदाच 'छत्रपती शिवाजी महाराज ' वारसा स्थळ दौऱ्याचे आयोजन केले आहे. यासाठी विशेष भारत गौरव पर्यटन रेल्वे सोडली जाणार आहे. या दौऱ्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाशी संबंधित महत्त्वाची ठिकाणे पर्यटकांना दाखवले जातील. या दौऱ्यात पर्यटकांना रायगड किल्ला, पुण्यातील लाल महाल, कसबा गणपती आणि शिवसृष्टी, शिवनेरी किल्ला, भीमाशंकर ज्योतिर्लिंग, प्रतापगड किल्ला आणि कोल्हापूरमधील महालक्ष्मी मंदिर आणि पन्हाळा किल्ला दाखवण्यात येणार आहे, अशी माहिती रेल्वे मंत्रालयाने दिली आहे.
९ जून २०२५ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्टेशनपासून ही गाडी सोडली जाईल. ५ रात्री आणि ६ दिवसांचा हा प्रवास असेल. अत्याधुनिक भारत गौरव पर्यटन रेल्वेगाडीमध्ये स्लीपर, सेकंड एसी आणि थर्ड एसी कोचसह एकूण ७४८ पर्यटकांना सामावून घेण्याची क्षमता आहे. या वारसा प्रवासाची तिकिटे आयआरसीटीसी संकेतस्थळावरुन बुक करता येतील, असे मंत्रालयाने म्हटले आहे.
पहिल्या दिवशी पर्यटकांना रायगड किल्ला दाखवला जाईल. त्यासाठी रेल्वे कोकण रेल्वेच्या माणगाव रेल्वे स्थानकावर जाईल. रायगड किल्ल्याला भेट दिल्यानंतर, पर्यटक पुण्याला रवाना होतील. दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी, पर्यटकांना पुण्यातील प्रमुख पर्यटन स्थळे - लाल महाल, कसबा गणपती आणि शिवसृष्टी दाखवली जाईल. तिसऱ्या दिवशी पर्यटक छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान शिवनेरी किल्ल्याला भेट देतील. यानंतर पर्यटक १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिरात दर्शन घेतील.
चौथ्या दिवशी पर्यटक भारत गौरव रेल्वेने साताऱ्याला रवाना होतील आणि प्रतापगड किल्ल्याला भेट देतील. पाचव्या दिवशी सकाळी ही रेल्वेगाडी छत्रपती शाहू महाराज टर्मिनस, कोल्हापूर रेल्वे स्टेशनवर पोहोचेल. कोल्हापूरमध्ये पर्यटक महालक्ष्मी मंदिर (अंबाबाई) आणि नंतर पन्हाळा किल्ल्यावर जातील. कोल्हापूरमधून रात्री उशिरा मुंबईला परतीच्या प्रवासासाठी निघेल आणि सहाव्या दिवशी सकाळी मुंबईला पोहोचेल. या प्रवासामध्ये राहण्याची व्यवस्था, शाकाहारी जेवण, बसने प्रवास, प्रवास विमा इत्यादी सुविधा उपलब्ध असतील.