.jpg?rect=0%2C0%2C652%2C367&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?rect=0%2C0%2C652%2C367&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने शुक्रवारी दिल्लीत 70 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2022 ची घोषणा केली. यामध्ये सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट पुरस्कार वाळवी या चित्रपटाला जाहीर करण्यात आला आहे.
मल्याळम चित्रपट अट्टमने सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मचा पुरस्कार जिंकला, तर ऋषभ शेट्टीला सर्वोत्कृष्ट अभिनेता, नित्या मेनन आणि मानसी पारेख या दोन अभिनेत्रींना सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार जाहीर करण्यात आला. या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या घोषणेमध्ये पोनियिन सेल्वन : 1 या चित्रपटाला सर्वाधिक चार पुरस्कार जाहीर झाले आहेत. तसेच गुलमोहर या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट पुरस्कार घोषित करण्यात आला.
सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट पुरस्कार विजेत्या वाळवी चित्रपटाचे दिग्दर्शन परेश मोकाशी यांनी केले आहे. ‘मर्मर्स ऑफ द जंगल’ या मराठी चित्रपटाला नॉन फीचर पुरस्कार विभागातील ‘सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरी’ आणि ‘सर्वोत्कृष्ट कथन आणि आवाज पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे. या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन सोहिल वैद्य यांनी केले आहे.
2022 वर्षामधील राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार फीचर, नॉन फीचर आणि चित्रपटांवरील सर्वोत्कृष्ट लेखन अशा तीन विभागांमध्ये जाहीर करण्यात आले. यावेळी 27 फीचर चित्रपट पुरस्कार, 16 नॉन-फीचर पुरस्कार आणि दोन चित्रपटांवरील सर्वोत्कृष्ट लेखन पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. फीचर चित्रपट पुरस्कार निवडीच्या ज्युरीचे नेतृत्व राहुल रवैल, नॉन-फीचर ज्युरीचे नेतृत्व निला माधब पांडा आणि चित्रपटांवरील सर्वोत्कृष्ट लेखन ज्युरीचे नेतृत्व गंगाधर मुदलियार यांनी केले. कोरोनामुळे या पुरस्कारांची घोषणा दोन वर्षे उशिरा झाली.