

Bengaluru crime news
बंगळूर: कर्जाचा वाढता डोंगर आणि सावकाराच्या जाचाला कंटाळून एकाच कुटुंबातील चौघांनी गळा चिरून जीवन संपवण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना बंगळूरमध्ये घडली आहे. या घटनेत माय-लेकीचा जागीच मृत्यू झाला असून, मुलगा आणि भाचा रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहेत. अनेकल तालुक्यातील मल्लेनाहल्ली येथे शनिवारी रात्री १० च्या सुमारास हे धक्कादायक हत्याकांड घडले.
आशा (वय ५५), त्यांची मुलगी वर्षिता (वय ३२) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. तर मोहन एम.आर. (वय २६) आणि त्याचा भाचा मयांक (वय ११) यांची परिस्थिती गंभीर असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्राथमिक तपासानुसार, चिटफंड व्यवसायातील तोटा आणि आजारपणासाठी घेतलेल्या कर्जामुळे मोहननेच, आई आशा, बहिण वर्षिता आणि भाचा मयंक यांच्यावर चाकूने हल्ला करून त्यांचे गळे चिरले असावेत. त्यानंतर त्याने त्याच पद्धतीने स्वतःचा जीव घेण्याचा प्रयत्न केला असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
या कुटुंबाने आधी एक व्हिडिओ रेकॉर्ड केला होता. "सावकारांच्या सततच्या त्रासामुळे आणि दबावामुळे आम्ही जीवन संपवत आहोत," असे त्यांनी या व्हिडिओमध्ये म्हटले आहे. हा व्हिडिओ त्यांनी आपल्या नातेवाईकांनाही पाठवला होता. व्हिडिओ पाहिल्यानंतर नातेवाईकांनी तातडीने घराकडे धाव घेतली, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता.
घरातून ओरडण्याचे आवाज ऐकून शेजारी जमा झाले. घराचा मुख्य दरवाजा आतून बंद असल्याने त्यांनी तो तोडून आत प्रवेश केला. आत आशा आणि वर्षिता रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत पडल्या होत्या, तर मोहन आणि मयांक गंभीर जखमी अवस्थेत विव्हळत होते. शेजाऱ्यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली आणि जखमींना रुग्णालयात दाखल केले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या दीड वर्षांपासून वर्षिता हिच्या मेंदूमध्ये गाठ होती आणि ती गंभीर आजाराशी झुंज देत होती. तिच्या उपचारासाठी कुटुंबाने खूप कर्ज काढले होते. त्यातच मोहनला चिटफंड व्यवसायात मोठा तोटा झाला होता. या दुहेरी संकटामुळे मोहनने आधी आई, बहीण आणि भाच्याचा गळा चिरला आणि नंतर स्वतःचाही गळा चिरून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.