

Jaish e Mohammed Honey Trap : राजकीय नेत्यांची वैयक्तिक माहिती गोळा करण्यासाठी 'हनी-ट्रॅप'चे जाळे चालवणाऱ्या 'जैश-ए-मोहम्मद'च्या संशयित हस्तकाला मदत केल्याप्रकरणी एका महिलेला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई पश्चिम बंगाल पोलिसांच्या विशेष कृती दलाने (STF) झारखंड केली.
तपास अधिकाऱ्यांनी अटक केलेल्या महिलेचे नाव अर्पिता सरकार असे सांगितले असून, शुक्रवारी झारखंडमधील साहिबगंज जिल्ह्यातून तिला ताब्यात घेण्यात आले. 'जैश'चा संशयित हस्तक मोहम्मद हमीम मोंडल याच्याविरुद्ध सुरू असलेल्या तपासादरम्यान तिचे नाव समोर आले. 'पीटीआय'ने दिलेल्या माहितीनुसार, अर्पिता व्हॉट्सॲपच्या माध्यमातून मोंडलच्या सतत संपर्कात होती आणि तपासादरम्यान दोघांमधील चॅट पोलिसांच्या हाती लागले आहे.
एसटीएफच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्पिताने पश्चिम बंगालमधील प्रभावशाली राजकीय नेत्यांना आपल्या जाळ्यात ओढून त्यांची संवेदनशील वैयक्तिक माहिती गोळा करण्यासाठी 'हनी-ट्रॅप'च्या जाळ्यात मुख्य भूमिका बजावल्याचा आरोप आहे. "संशयित मॉड्यूलच्या कारवायांचा एक भाग म्हणून अर्पिताने टार्गेट केलेल्या व्यक्तींना आकर्षित करण्यासाठी 'हनी-ट्रॅप'च्या जाळ्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याचा आरोप आहे. राजकीय व्यक्तींची संवेदनशील माहिती मिळवण्यासाठी या आरोपींनी जाळे तयार करण्याचा प्रयत्न केल्याचे आमच्या तपासातून समोर आले आहे," अशी माहिती एसटीएफच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
मोंडलने अर्पिताचा वापर करून प्रभावशाली राजकीय नेत्यांशी संपर्क प्रस्थापित केला. त्यांची वैयक्तिक माहिती गोळा केली, असा आरोप अधिकाऱ्यांनी केला आहे. ही माहिती भविष्यातील दहशतवादी हल्ल्यांसाठी किंवा इतर देशविरोधी कारवायांसाठी गोळा केली जात होती का, याचा तपास आता पोलीस करत आहेत. अर्पिताला पूर्व वर्धमान येथे आणण्यात आले असून, तिला स्थानिक न्यायालयात हजर केले जाणार आहे.
हमीम मोंडल याला गुरुवारी वर्धमान शहरातील एका गृहसंकुलातील भाड्याच्या घरातून अटक करण्यात आली होती. एसटीएफच्या माहितीनुसार, तो आयएसआयचा (ISI) पाठिंबा असलेल्या 'जैश-ए-मोहम्मद'च्या नेटवर्कचा भाग असल्याचा संशय आहे. त्याच्यावर भाजप नेत्यांसह व्हीआयपींची माहिती गोळा करणे, नवीन हस्तकांची भरती करणे आणि पश्चिम बंगालमध्ये संभाव्य दहशतवादी कारवायांसाठी पार्श्वभूमी तयार करण्याचे काम सोपवण्यात आले होते. मोंडलचे मूळ घर पूर्व वर्धमान जिल्ह्यातील दीर्घानगर गावात आहे, परंतु त्याचे कुटुंब नुकतेच वर्धमान येथील भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहण्यास आले होते, जिथून त्याला अटक करण्यात आली. या कथित नेटवर्कचा पूर्ण विस्तार आणि यामध्ये सामील असलेल्या इतर लोकांची भूमिका स्पष्ट करण्यासाठी पोलीस पुढील तपास करत आहेत.