Darjeeling landslide
दार्जिलिंग : दार्जिलिंगमध्ये मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. जोरदार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर भूस्खलन झाले असून, त्यात आतापर्यंत २८ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी बहुतेक जण मिरिकच्या हिल स्टेशनमध्ये होते आणि अनेक लोक बेपत्ता आहेत.
शनिवारी रात्री आणि रविवारी उत्तर बंगालच्या डोंगराळ आणि मैदानी भागात झालेल्या अविरत पावसामुळे दरडी कोसळल्या अनेक पूल वाहून गेले. दार्जिलिंगपासून कूचबिहारपर्यंतच्या शहरांमध्ये पाणी साचले आहे. शनिवारी सकाळी ८ वाजल्यापासून दार्जिलिंगमध्ये २४ तासांत २६१ मिमी पाऊस पडला. कूचबिहारमध्ये १९२ मिमी आणि जलपाईगुडीत १७२ मिमी पाऊस पडला. गजोलडोबा (जलपाईगुडी) येथे ३०० मिमी पाऊस पडला. पावसामुळे मिरिक, जोरबंगलो, मानेभंजंग, सुखियापोखरी आणि फालकाटा येथे सर्वात जास्त नुकसान झाले.
या दुर्घटनेचा सर्वाधिक फटका पर्यटकांसाठी प्रसिद्ध असलेल्या मिरिक शहराला बसला आहे. मिरिकमध्ये १३ लोकांचा मृत्यू झाला. सुमेन्दु तलाव आणि कांचनजंगाच्या विहंगम दृश्यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या या शहरातून रविवारी सायंकाळपर्यंत कोलकाता येथील पर्यटक १० जण बेपत्ता होते. अनेक दुर्गम भागांशी संपर्क तुटल्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
या पावसामुळे अनेक महत्त्वाचे संपर्क तुटले आहेत:
सिलीगुडी आणि मिरिकला जोडणारा बालासन नदीवरील डुधिया येथील लोखंडी पूल कोसळल्याने दोन्ही शहरांमधील थेट मार्ग पूर्णपणे बंद झाला आहे.
रोहिणी रोड, जो दार्जिलिंग आणि मैदानी प्रदेशांना जोडणारा प्रमुख मार्ग आहे, तो खचला आहे.
सिक्कीमची जीवनवाहिनी असलेला राष्ट्रीय महामार्ग १० (NH10) भूस्खलनामुळे चित्रे येथे बंद करण्यात आला.
दार्जिलिंग हिमालयन रेल्वेची सेवाही अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहे.