

कोटा : वैद्यकीय प्रवेश परिक्षा नीटची (NEET) तयारी करणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थ्याने शनिवारी (दि.४) संध्याकाळी उशिरा गळफास घेऊन जीवन संपवले. ती आज (दि.४) होणाऱ्या NEET परीक्षेला बसणार होती. कुन्हाडी पोलिस स्टेशन हद्दीतील पार्श्वनाथपुरम कॉलनीमध्ये ही घटना घडली, जिथे विद्यार्थिनीने तिच्या खोलीत दुपट्ट्याने गळफास घेत जीवन संपवले. जेव्हा ही दुर्घटना घडली तेव्हा विद्यार्थिनीचे कुटुंब घरीच होते.
कुन्हाडी पोलिस ठाण्याचे सर्कल इन्स्पेक्टर अरविंद भारद्वाज यांच्यामते विद्यार्थिनीचे कुटुंब मूळचे मध्य प्रदेशातील श्योपूर जिल्ह्यातील आहे. ते मुलीच्या वैद्यकीय प्रवेश परीक्षेच्या तयारीसाठी कोटा येथे राहत होते. मात्र विद्यार्थिनीने आज होणाऱ्या NEET परीक्षेपूर्वीच जीवन संपवले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि विद्यार्थिनीला ताबडतोब एमबीएस रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
सध्या पोलीस संबंधित विद्यार्थिनीने जीवन का संपवले. या मागील कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत आणि या संदर्भात कुटुंबातील सदस्यांची चौकशी केली जात आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी शवागारात ठेवण्यात आला आहे, त्यानंतर तो कुटुंबीयांना सोपवला जाईल.
शैक्षणिक शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोटामध्ये या वर्षी ही १४ वी जीवन संपवल्याची घटना ठरली आहे. केवळ एप्रिलमध्ये येथे ४ विद्यार्थ्यांनी आपला जीव गमावला आहे, तर मे महिन्याच्या सुरुवातीला ही पहिली घटना समोर आली आहे. यापूर्वी २८ एप्रिलच्या रात्री बिहारच्या तमीम इक्बालनेही गळफास घेत जीवन संपवले होते. कोचिंग हब बनलेल्या कोटामध्ये आत्महत्यांच्या वाढत्या संख्येने प्रशासन, पालक आणि संपूर्ण समाजाला विचार करण्यास भाग पाडले आहे. विद्यार्थी मानसिक दबाव आणि स्पर्धेच्या आगीत कसे जळत आहेत याचे एक वेदनादायक उदाहरण पुन्हा एकदा समोर आले आहे.