

नवी दिल्ली : बांगलादेशातील मैमनसिंग येथील हिंदू युवक दीपू चंद्र दास यांच्या हत्येचा भारताने शुक्रवारी निषेध केला. बांगलादेशातील हिंदूंसह अल्पसंख्याकांवरील हिंसाचाराच्या घटनांना माध्यमांची अतिशयोक्ती म्हणून दुर्लक्षित केले जाऊ शकत नाही किंवा राजकीय हिंसाचार म्हणून फेटाळले जाऊ शकत नाही, असा इशारा भारताने दिला. अल्पसंख्याकांबद्दलचा 'सततचा द्वेष' ही एक गंभीर चिंतेची बाब असल्याचे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले. बांगलादेशातील आगामी संसदीय निवडणुका मुक्त, निष्पक्ष आणि सर्वसमावेशक झाल्या पाहिजेत, असे देखील परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले.
बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (बीएनपी) चे कार्यकारी अध्यक्ष तारिक रहमान यांच्या मायदेशी परतण्यावर भारताने प्रतिक्रिया व्यक्त केली आणि म्हटले की, या घटनेला सर्वसमावेशक निवडणुका घेण्याच्या संदर्भात पाहिले पाहिजे. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले की, हिंदू, ख्रिश्चन आणि बौद्ध यांच्यासह बांगलादेशातील अल्पसंख्याकांवरील सततचा द्वेष हा गंभीर चिंतेचा विषय आहे.
आम्ही बांगलादेशातील एका हिंदू युवकाच्या अलीकडील हत्येचा निषेध करतो. या गुन्ह्याच्या दोषींना न्याय मिळवून दिला जाईल अशी अपेक्षा करतो, असे ते त्यांच्या साप्ताहिक पत्रकार परिषदेत म्हणाले. भारत बांगलादेशातील घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, बांगलादेशातील अंतरिम सरकारच्या कार्यकाळात अल्पसंख्याकांविरुद्ध हिंसाचाराच्या २,९०० हून अधिक घटनांची नोंद झाली असल्याचे ते म्हणाले.
देशातून फरार झालेल्या आरोपींना परत आणण्यासाठी सरकार कटिबद्ध
ललित मोदी आणि विजय माल्या यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर काही दिवसांनी परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, भारत आर्थिक गुन्हेगारांना परत आणण्यासाठी कटिबद्ध आहे. प्रत्यार्पणाचे प्रयत्न सुरू आहेत. फरारी आरोपींना परत आणण्यासाठी भारत विविध देशांच्या सरकारांशी चर्चा करत आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते म्हणाले.