

Bangladesh Hindu Youth Murdered
ढाका: बांगलादेशात अल्पसंख्याक हिंदूंवरील हल्ल्यांचे सत्र सुरूच असून, दीपू चंद्र दास यांच्या निर्घृण हत्येनंतर आता आणखी एका हिंदू तरुणाची जमावाने बेदम मारहाण करून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. राजधानी ढाकापासून साडेतीन तासांच्या अंतरावर असलेल्या राजबारी जिल्ह्यातील पांगशा उपजिल्हा परिसरात बुधवारी रात्री उशिरा ही घटना घडली. अमृत मोंडल ऊर्फ सम्राट (२९) असे मृत तरुणाचे नाव आहे. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, बुधवारी रात्री उशारी हा प्रकार घडला.
'द डेली स्टार' या बांगलादेशी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, सम्राट हा 'सम्राट वाहिनी' टोळीचा प्रमुख होता. शेख हसीना यांची सत्ता गेल्यावर तो देशाबाहेर पळून गेला होता, मात्र काही दिवसांपूर्वीच तो आपल्या 'होसेनडांगा' या मूळ गावी परतला होता. सम्राट आपल्या काही साथीदारांसह शाहीदुल इस्लाम नावाच्या ग्रामस्थाच्या घरी खंडणी मागण्यासाठी गेला होता. यावेळी घरातील सदस्यांनी दरोडेखोर आले असे म्हणत आरडाओरडा केला. ग्रामस्थ जमा झाले. जमावाने सम्राटला पकडून बेदम मारहाण केली, तर त्याचे इतर साथीदार पळून जाण्यात यशस्वी झाले.
या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी सम्राटला संतप्त जमावाच्या तावडीतून सोडवून तातडीने रुग्णालयात नेले. मात्र त्याचा उपाचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या कारवाईदरम्यान पोलिसांनी सम्राटचा सहकारी मोहम्मद सलीम याला अटक केली आहे. , त्याच्याकडून दोन पिस्तूल जप्त करण्यात आली आहेत. काही दिवसांपूर्वीच दीपू चंद्र दास यांची हत्या करून त्यांचा मृतदेह जाळण्यात आल्याची घटना ताजी असतानाच, आता या नवीन घटनेमुळे बांगलादेशातील अल्पसंख्यांक हिंदू समुदायामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.