

पुढारी ऑनलाईन डेस्क : वर्ष 1926. ओडिसातील ढेंकनाल जिल्ह्यातील नीलकंठपूर गावात 5 ऑक्टोबरला बाजी राउत याचा जन्म झाला. बाजीने अगदी लहान वयातच वडील गमावले. त्याची आई कसंबसं घर चालवत असे. त्यावेळी ढेंकनालचा राजा शंकर प्रताप सिंहदेव होता, जो गरिबांच्या कमाईचे शोषण करण्यासाठी प्रसिद्ध होता. बाजीची आईही त्याच्या अन्यायाला बळी पडली होती.
ओडीसा इतका दबावाखाली होता की, बंडखोरीची वेळ आली होती. ढेंकनाल येथील वैष्णव चरण पटनायक यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले. लोक त्यांना प्रेमाने 'वीर बैष्णव' म्हणत. त्यांनी लोकांना एकत्र करून 'प्रजामंडल' ही संघटना स्थापन केली आणि राजाविरुद्ध बंड सुरू केले. अन्यायाविरुद्ध लढणा-या या संघटनेत शाळकरी मुलांचीही एक शाखा होती, ज्याचे नाव वानर सेना असे होते. शाळकरी मुलगा बाजी राउत हा या शाखेचासदस्य होता.
पटनायक यांनी रेल्वेमध्ये पेंटरची नोकरी पत्करली. ही नोकरी मिळवण्यामागे एक खास योजना होती. रेल्वेत नोकरी मिळाल्याने पटनायक रेल्वे पासच्या जोरावर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात आणि विविध भागातील लोकांना आपल्यावर होणा-या अन्यायाविरुद्ध जागरूक करत. त्यांनी कटकमध्ये राष्ट्रीय काँग्रेसच्या सदस्यांना भेटून ढेंकनालच्या परिस्थितीची जाणीवही करून दिली.
पटनायक यांनी मार्क्सवादी धोरणांचा अभ्यास करण्यास सुरुवात केली. स्थानिक विचारवंत हर मोहन पटनायक यांच्यासमवेत त्यांनी 'प्रजामंडल आंदोलन' सुरू केले, ज्याचा अर्थ 'जनतेची पार्टी' असा होता. हे आंदोलन हळूहळू वाढले. परिणामी ढेंकनालचा राजा संतापला. आपल्या विरोधातील आंदोलन चिरडून टाकण्यासाठी त्याने कंबर कसली. इतर राजांनीही त्याला साथ देत मदतीसाठी सैन्याची कुमक पाठवली. इंग्रजांनीही मदतीचा हात देत कोलकात्याहून 250 बंदुकधारी सैनिकांनी तुकडी पाठवली.
लोकांची आर्थिक स्थिती खालावण्यापेक्षा आणखीन चांगले काय असू शकते? शंकर प्रतापने लोकांवर 'राजभक्त कर' किंवा 'लॉयल्टी टॅक्स' लादला. हा कर भरण्यास असमर्थ असलेल्यांची घरे शाही हत्तींच्या बळावर उद्ध्वस्त केली. एवढेच नाही तर त्याची उर्वरित मालमत्ताही जप्त करण्यात आली. या अत्याचाराने सर्वांना एकत्र आणले आणि राजाच्या विरोधातील आंदोलन तीव्र होऊ लागले.
संतप्त झालेल्या राजा शंकर प्रतापने या आंदोलनातील नेत्यांवर इंग्रज सैनिकांच्या जोरावर हल्ले करण्यास सुरुवात केली. या कारवाई दरम्यान त्यांनी वीर वैष्णव यांची सर्व वडिलोपार्जित मालमत्ता बळकावली. याशिवाय 22 सप्टेंबर 1938 रोजी हर मोहन पटनायक यांच्या घरावर छापा टाकून तिथे उपस्थित असलेल्या आंदोलकांन अटक केली. मात्र पटनायक तेथूनही पसार होण्यात यशस्वी झाला.
मात्र, इंग्रज सैनिकांनी पटनायकाचा शोध सुरूच ठेवला. एक दिवस पटनायक हे भुबन गावात असल्याची माहिती मिळाली. १० ऑक्टोबर १९३८ रोजी या गावावर इंग्रज सैनिकांनी हल्ला केला. ग्रामस्थांच्या घरांची तोडफोड करण्यास सुरूवात केली. दरम्यान, भुबन गावावरील छाप्यानंतर पटनायकने ब्राह्मणी नदीत उडी मारून गाव ओलांडल्याची अफवा पसरली. सैनिकांनी ताबडतोब त्या दिशेने शोध सुरू केला.
नदीच्या पलिकडील बाजूस ते गेले. तेथे त्यांना स्थानिक लोक आढळले. पण त्या लोकांनी पटनायकबद्दल काहीच माहिती दिली नाही. अखेर ब्रिटिश सैनिकांचा गोळीबार केला. यात रघु नाईक आणि कुरी नाईक या दोघांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना समजताच त्या गावातील लोक आक्रमक झाले. त्यांनी सैनिकांवर प्रतिहल्ला करण्यासाठी धाव घेतली; पण सैनिकांनी घटनास्थळावरून पळ काढत ब्राह्मणी नदी काठाला असणा-या नीलकंठपूर गावात आले. जमावापासून वाचण्यासाठी त्यांना आता नदी पार करून पलिकडच्या गावात जाण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. ते नदीकाठी आले.
योगायोगाने त्यादिवशी बाजी राऊत हा बारा वर्षाचा शाळकरी मुलगा प्रजामंडल संघटनेने नदीकाठी इंग्रज सैन्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी पार पाडत होता. तसेच त्याच्याकडे तेथे असणा-या बोटीच्या रक्षणाचेही काम देण्यात आले होते. इंग्रज सैनिक नदी काठावर आले तेव्हा बाजी राऊत बोटीतच होता. 11 ऑक्टोबर 1938 ची ती भयंकर रात्र होती. सैनिकांनी बाजी राऊतला 'आम्हाला बोटीतून नदीपलीकडे घेऊन चल' असा आदेश दिला. पण धैर्यवान बाजीने इंग्रज सैनिकांना नदी ओलांडू देण्यास स्पष्टपणे नकार दिला. त्याचा नकार सहन न झाल्याने एका संतप्त इंग्रजाने बाजीच्या डोक्यावर बंदुकीच्या दांड्याने प्रहार केला. त्यामुळे बाजी जखमी होऊन खाली पडला. पण तरीही आपल्या निर्णयावर ठाम राहिला.
यानंतर आणखी एका इंग्रज सैनिकाने त्यांच्यावर हल्ला केला. पण तरीही बाजी त्याला मोठ्या आवाजात ओरडत नकार देत राहिला. यानंतर एका इंग्रज सनिकाने बाजीवर गोळी झाडली. एका बारा वर्षाच्या चिमुकल्यावर झालेला अत्याचार पाहून एका ग्रामस्थाने तत्काळ गावात पोहोचून लोकांना याची माहिती दिली. गावकरी आक्रोश करत ते नदीकाठी आले. एवढा जमाव पाहून इंग्रज सैनिक घाबरले आणि ताबडतोब बोटीत बसून पटनायकला विसरून गाव सोडून पळू लागले. मात्र यावेळी त्यांनी पुन्हा एकदा गोळीबार केला. त्यात आणखी चार जणांचा मृत्यू झाला.
वैष्णव पटनायक यांनी बाजी राऊतसह इतरांचे मृतदेह कटक येथे आणले. या हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने लोक पुढे आले. या सर्व शहीदांची कटकच्या रस्त्यावरून अंत्ययात्रा काढण्याचे ठरले. जेणेकरून प्रत्येकाला ओडीसाच्या या वीरांचे दर्शन घेता येईल. या कार्यक्रमात राज्यभरातून हजारो लोक सहभागी झाले. बाजी राऊतच्या शौर्याच्या चर्चा सर्वत्र रंगू लागल्या. बाजीसाठी ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त सच्चिदानंद राऊत्रे यांनी उडिया भाषेत एक कविता लिहिली, ज्याचा अनुवाद पुढीलप्रमाणे आहे.
भाऊ… ही चिता नाही…
देशावरचा अंध:कार दूर करण्यासाठीची ही मोक्षाची मशाल आहे…
अशा प्रकारे वानर सेनेचा सदस्य बाजी राऊत यांने वयाच्या अवघ्या 12 व्या वर्षी देशासाठी बलिदान दिले. आजही आपण त्याचे देशातील सर्वात लहान स्वातंत्र्यसैनिक म्हणून स्मरण करतो.