

पुढारी ऑनलाईन डेस्क : आम आदमी पक्षाच्या नेत्या आतिशी मार्लेना (Atishi Marlena) यांनी आज (दि.२१ सप्टेंबर) दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. सुषमा स्वराज, शीला दीक्षित यांच्यानंतर त्या दिल्लीच्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री बनल्या आहेत. मुख्यमंत्री आतिशी यांच्यासोबत मुकेश अहलावत, इम्रान हुसेन, गोपाल राय,सौरभ भारद्वाज आणि कैलाश गहलोत या आप नेत्यांनी देखील मंत्री पदाची शपथ घेतली. दिल्लीतील राज निवास येथे नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना यांनी आतिशी यांना मुख्यमंत्री पद आणि गोपनियतेची शपथ दिली.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली. यानंतर केजरीवाल यांनी मुख्यमंत्री पदाची सूत्र आतिशी मार्लेना (Atishi Marlena) यांच्याकडे सोपवण्याचा निर्णय घेतला. यानंतर त्यांनी दिल्लीच्या नायब राज्यपालांची भेट घेत, सत्ता स्थापनेचा दावा केला. त्यांच्या नावाला विधिमंडळ पक्षाच्या बैठकीतही मंजुरी मिळाली. यानंतर आतिशी यांनी आज २१ सप्टेंबर रोजी दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. या प्रसंगी दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांच्यासह आप नेत्या आतिशींचे आई-वडील तृप्ता वाही आणि विजय सिंह हे देखील राज निवास येथे उपस्थित होते.
आम आदमी पार्टीच्या ४३ वर्षीय नेत्या आतिशी मार्लेना (Atishi Marlena) पंजाबी राजपूत कुटुंबातून आहेत. त्यांचा जन्म ८ जून १९८१ रोजी दिल्लीत झाला. त्यांचे वडील नामविजय सिंह हे दिल्ली विद्यापीठात प्राध्यापक आहेत. आतिशी यांचे शालेय शिक्षण स्प्रिंगडेल स्कूल नवी दिल्ली येथे झाले. त्यांनी सेंट स्टीफन कॉलेजमध्ये इतिहासाचा अभ्यास केला आणि ऑक्सफर्ड विद्यापीठातून चेव्हनिंग स्कॉलरशिपवर पदव्युत्तर पदवी मिळवली. काही वर्षांनी त्यांनी ऑक्सफर्डमधून शैक्षणिक संशोधनात रोड्स स्कॉलर म्हणून दुसरी पदव्युत्तर पदवी मिळवली. त्यांनी मध्य प्रदेशातील एका गावात सात वर्षे सेंद्रिय शेती आणि प्रगतीशील शिक्षण प्रणालींमध्ये अभ्यास केला. तिथे अनेक संस्थांसोबत त्यांनी काम केले आणि तिथूनच त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला. तिथेच त्या प्रथम काही आप पक्षाच्या सदस्यांना भेटल्या होत्या.
२०२० मध्ये आतिशी (Atishi Marlena) पहिल्यांदाच कालकाजी विधानसभा मतदारसंघातून आमदार झाल्या. त्यांनी भाजपचे उमेदवार धरमवीर सिंह यांचा ११ हजार ३९३ मतांनी पराभव केला. २०२३ मध्ये पहिल्यांदा त्यांना केजरीवाल सरकारमध्ये मंत्री पदाची संधी मिळाली. अवघ्या एका वर्षानंतर २०२४ मध्ये त्या मुख्यमंत्री झाल्या आहेत. यापूर्वी त्यांनी २०१९ मध्ये पूर्व लोकसभेच्या जागेवरून निवडणूक लढवली होती. भाजपचे उमेदवार गौतम गंभीर यांच्याकडून ४.७७ लाख मतांनी त्या पराभूत झाल्या होत्या. आतिशी या केजरीवाल यांच्या जवळच्या सहकारी आणि विश्वासू मानल्या जातात. अण्णा हजारे यांच्या आंदोलनाच्या काळापासून त्या संघटनेत सक्रिय आहेत. सध्या त्यांच्याकडे बहुतांश मंत्रालयांची जबाबदारी आहे. मार्चमध्ये केजरीवाल तुरुंगात गेल्यापासून त्या पक्षापासून ते सरकारपर्यंतच्या सर्व मुद्द्यांवर पुढाकार घेताना दिसत आहेत.