

पुढारी ऑनलाईन डेस्क: Atishi Marlena | आम आदमी पक्षाने (आप) माजी मुख्यमंत्री अतिशी मार्लेना सिंग यांची दिल्ली विधानसभेतील विरोधी पक्षनेते म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. फेब्रुवारी २०२४ मध्ये सुरू होणाऱ्या विधानसभा अधिवेशनाच्या अगदी आधी रविवारी (दि.२३) आपच्या विधिमंडळ पक्षाच्या सदस्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
कालकाजी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अतिशी यांनी यापूर्वी सप्टेंबर २०२४ ते फेब्रुवारी २०२५ पर्यंत दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले आहे. या निर्णयाची पुष्टी करताना आप नेते गोपाल राय यांनी एएनआयला सांगितले की, "आजच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत, अतिशी दिल्ली विधानसभेत विरोधी पक्षनेते म्हणून काम करतील असा एकमताने निर्णय घेण्यात आला. आव्हानात्मक काळात, त्यांनी मुख्यमंत्री म्हणून दिल्लीतील लोकांसाठी अथक परिश्रम घेतले आहेत. आप एक जबाबदार विरोधी पक्ष म्हणून आपली भूमिका पार पाडेल."
५ फेब्रुवारी रोजी जाहीर झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपने ७० पैकी ४८ जागा जिंकत तब्बल २७ वर्षानंतर दिल्लीतील सत्ता परत मिळवली. या निवडणूकीत आम आदमी पक्षाला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. 'आप'चे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल आणि ज्येष्ठ नेते मनीष सिसोदिया यांच्यासह पक्षाच्या अनेक नेत्यांना या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला. याच निवडणुकीत अतिशी मार्लेना यांनी कालकाजी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत विजय मिळवला. त्यामुळे या निवडणुकीत आपच्या मोठ्या झालेल्या पराभवानंतर अतिशी यांची विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आपते सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी देखील आप नेत्या आतिशी मार्लेना यांचे अभिनंदन करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी सोशल मीडिया एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे की, " 'आप'च्या सभागृहातील नेतेपदी निवड झाल्याबद्दल मी आतिशीजींचे अभिनंदन करतो. दिल्लीच्या जनतेच्या हितासाठी 'आप' रचनात्मक विरोधी पक्षाची भूमिका बजावेल".