

पुढारी ऑनलाईन डेस्क: Ramdas Athawale |मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी रविवार (दि.१५) राजभवन परिसरात पार पडला. यामध्ये अनेक नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली. तर अनेक ज्येष्ठ राजकीय नेत्यांचा पत्ता कट झाला. त्यामुळे सत्ताधारी महायुती पक्षांतील नेत्यांमध्ये नाराजी नाट्य पहायला मिळत आहे. आरपीआय पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी देखील त्यांच्या नाराजी व्यक्त केली आहे. या संदर्भातील वृत्त 'PTI' ने दिले आहे.
भारतीय रिपब्लिकन पक्षाचे (आठवले) अध्यक्ष रामदास आठवले यांनी पीटीआयला आज (दि.१६) दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे की, “मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. तेव्हा त्यांनी आश्वासन दिले होते की, आरपीआय (अ) ला मंत्रिमंडळात स्थान मिळेल. परंतु तसे झाले नाही. त्यामुळे मी आणि आमचा पक्ष नाराज आहे. आमची मागणी अशी आहे की, एक मंत्रिपद शिल्लक आहे आणि ते आरपीआयला (RPI) मिळावे, अशी मागणी सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.