

पुढारी ऑनलाईन डेस्क: मागील काही दिवसांपूर्वी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) असलेल्या सुनिता विल्यम्स यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्याचा दावा नासाच्या सूत्रानुसार अमेरिकन मीडियाने केला होता. परंतु स्वत: अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांनीच त्यांच्या आरोग्याबद्दल महत्त्वाची अपडेट नासाला दिली आहे.
भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स या नासाच्या मोहिमेंतर्गत ५ जूनला बोईंग स्टारलाइनर अंतराळयानातून अंतराळ स्थानकावर पोहचल्या. सुरूवातील त्या १० दिवस म्हणजे साधारण १ आठवडा अंतराळात थांबणार होत्या. मात्र अंतराळयानात बिघाड झाल्याने त्यांचा मुक्काम वाढला. गेले ५ महिन्यांपासून त्या अंतराळात आहेत. त्यांच्यासोबत त्यांचे सहकारी बुच विल्मोर देखील आहेत. विल्यम्स यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीनुसार त्यांच्या वजनात फारसा बदल झालेला नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.
तीन दिवसांपूर्वी अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांचे १५० दिवसांनंतरचे अंतराळातील छायाचित्र समोर आले होते. यामध्ये सुनीता विल्यम्स अशक्त झाल्याच्या दिसत होत्या तर त्यांचे वजन कमालीचे घटल्याचे देखील दिसले. नासाने काही आठवड्यांपूर्वी प्रसिद्ध केलेल्या छायाचित्राच्या आधारे अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये सुनीता यांचे वजन अंतराळात वेगाने कमी होत असल्याचा दावा केला होता. यावर सुनीता म्हणाल्या, तिचे वजन कमी झाले असून, ते प्रकृती बिघडल्याने नाही तर अंतराळातील मायक्रोग्रॅव्हिटीमुळे शरीरातील सामान्य 'फ्लुइड शिफ्ट' झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.
मीडियातील खळबळजनक वृत्त फेटाळून लावत सुनीता विल्यम्स म्हणाल्या की, त्यांची प्रकृती उत्तम आहे. तसेच प्रकृती जपण्यासाठी अंतराळ स्थानकावर ती खूप व्यायाम करत आहे. विल्यम्स यांनी त्यांच्या दैनंदिनीचे तपशीलवार वर्णन केले, ज्यामध्ये व्यायाम, बाइक चालवणे, ट्रेडमिलवर धावणे आणि वेटलिफ्टिंग यांचा समावेश आहे. या क्रियाकलापांमुळे तिच्या शरीरात लक्षणीय बदल झाल्याचे त्या सांगतात.तसेच ऑलिव्ह आणि भातासोबत तुर्की फिश स्टू देखील ती खात असल्याचे तिने स्वत: म्हटले आहे.