बीएसएनएलचा उपयोग दुभत्या गाईसारखा झाला : मंत्री वैष्णव
नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा – तत्कालीन संपुआ सरकारच्या कार्यकाळात काही लोकांनी भारत संचार निगम लिमिटेड अर्थात बीएसएनएलचा वापर दुभत्या गाईसारखा केला, असा गंभीर आरोप दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुधवारी लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात केला. वैष्णव यांच्या या वक्तव्यावर कॉंग्रेससहित इतर विरोधी पक्षांच्या खासदारांनी एकच गदारोळ केला.
वैष्णव म्हणाले-बीएसएलएलचे पुनरुज्जीवन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1.64 लाख कोटी रुपयांचे पॅकेज दिले असून आगामी काळात बीएसएनएल नक्कीच चांगली कंपनी बनेल. वैष्णव पुढे म्हणाले की, तत्कालीन संपुआ सरकारच्या काळात काही लोकांनी या कंपनीचा वापर दुभत्या गाईसारखा केला होता. याची फळे आपण अजुनही भोगत आहोत. त्या काळात सरकारमध्ये असलेले काही लोक आजही खासदार आहेत. संपुआ सरकारच्या काळात बीएसएनएलचा बराचसा पैसा इतरत्र वळविण्यात आला होता. मात्र 'मेक इन इंडिया'चा दृष्टीकोण डोळ्यासमोर आगामी काळात बीएसएनएल 4 जी आणि 5 जी सेवा सुरु करणार आहे.
वैष्णव यांनी अन्य एका प्रश्नाच्या उत्तरावर सर्वात स्वस्त दरात डेटा प्रदान करणाऱ्या देशांमध्ये भारताचा समावेश होतो, अशी माहिती दिली. संपुआ सरकारच्या काळात एक जीबी डेटा 200 रुपयांना मिळत होता. तर सध्या एक जीबी डेटासाठी २० रुपये मोजावे लागतात, असे त्यांनी नमूद केले.
ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे प्रवासात सवलत नाही
दरम्यान ज्येष्ठ नागरिक आणि अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना रेल्वे प्रवासात सवलत दिली जाणार नसल्याची स्पष्टोक्ती वैष्णव यांनी लोकसभेत दिली. सध्या रेल्वेची प्रवासी वाहतूक तोट्यात आहे. प्रवाशांना रेल्वेकडून 59 हजार कोटी रुपयांची वार्षिक सबसिडी दिली जात आहे. अशा स्थितीत आगामी काळात ज्येष्ठ नागरिक व पत्रकारांना तिकीट दरात सवलत देता येणे शक्य होणार नाही, असे वैष्णव यांनी नमूद केले.