

Ashok Dham Temple Stampede: श्रावण महिन्यातील सोमवारी सकाळी लखीसरायमधील प्रसिद्ध अशोकधाम मंदिराच्या परिसरात मोठी चेंगराचेंगरी झाली त्यात आतापर्यंत ७ भाविकांचा मृत्यू झाला असून ८ पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. त्यांना लखीसराय रूग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.
या घटनेत मृतांची संख्या वाढण्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे. डखीसराय डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट यांनी सांगितलं की ही घटना अशोकधाम स्टेशनवरून मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर झाली. सोमवारी सकाळी साडे सहा ते सात वाजण्याच्या दरम्यान गर्दी अचानक वाढली.
लखीसराय जिल्हा पदाधिखारी शैलेंद्र कुमार यांनी सांगितलं की श्रावण सोमवारी सकाळी भाविकांची गर्दी अचानक वाढली आणि रांग ही अशोकधाम हॉल्टपर्यंत पोहचली होती. हॉल्टवर दोन ट्रेन थांबल्या होत्या. मात्र त्याचवेळी विजेचा खांब अचानक भाविकांच्या रांगेच्या दिशेने कोसळला.
विजेचा खांब पडल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. लोकांच्या अंगावर विजेची तार पडल्याची माहिती देखील पसरली. मात्र ही वायर केबल वायर होती. यामुळं महिलांच्या रांगेवर अचानक दबाव वाढला. चेंगराचेंगरी झाली आणि महिला एकमेकांच्या अंगावर पडल्या.
हा सर्व प्रकार दोन मिनिटात झाला, प्रशासनाने सांगितलं की पोलीस प्रशासन सकाळी ३ वाजल्यापासून या भागात गस्त घालत होता. ही घटना अचानक २ मिनिटात घडली. प्रशासनाची एक टीम सध्या रूग्णालयात आहे. मृतांमध्ये सर्व महिला आहेत.
एका वृद्ध भाविकेने सांगितलं की त्या रांगेत उभ्या असतानाच पाठीमागून १० ते १२ महिलांनी पाठीमागून त्यांना धक्का दिला अन् त्या बेशुद्ध पडल्या.