‘योगीजी, तुमचे शत्रू तुमच्या पक्षातच… मला का शिव्या देता?’ : अरविंद केजरीवाल

‘योगीजी, तुमचे शत्रू तुमच्या पक्षातच… मला का शिव्या देता?’ : अरविंद केजरीवाल

पुढारी ऑनलाईन डेस्क : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सतत भाजपवर हल्लाबोल करत आहेत. आज पत्रकार परिषदेत त्यांनी पुन्हा भाजपवर निशाणा साधला. "उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिल्लीत येऊन मला शिवीगाळ केली. योगीजी मी तुम्हाला नम्रपणे सांगतो की, तुमचे खरे शत्रू तुमच्या पक्षात बसले आहेत. तुम्ही मला शिव्या का देता? लोकसभा निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी तुम्हाला मुख्यमंत्री पदावरून हटवण्याची तयारी केली आहे, असे केजरीवाल म्हणाले.

इंडिया आघाडीला ३०० पेक्षा जास्त जागा मिळतील

देशाला वाचवायच असेल तर इंडिया आघाडी जिंकणे गरजेच आहे. पाचव्या टप्प्यातील मतदान झाले आहे. मतदानाचे टप्पे पार पडत असताना मोदी सरकार जाणार हे स्पष्ट होत असून इंडिया आघाडीचे सरकार स्थापन होणार आहे. ४ जूनला इंडिया आघाडीला ३०० पेक्षा जास्त जागा मिळतील. देशाला स्थिर सरकार देण्याच्या दिशेने इंडिया आघाडी वाटचाल करत असल्याचे केजरीवाल यांनी सांगितले.

अमित शहा यांच्यावर जोरदार टीका

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर केजरीवाल यांनी जोरदार टीका केली. काल दिल्लीत अमित शाह यांनी आम आदमी पक्षाच्या समर्थकांना पाकिस्तानी म्हटले. पंजाब, दिल्ली, गुजरात आणि गोव्याचे लोक पाकिस्तानी आहेत का? गुजरातमधील १४ टक्के लोकांनी आपला मतदान केले, ते पाकिस्तानी आहेत का? ही कोणत्या प्रकारची भाषा आहे? पंतप्रधानांनी तुमची उत्तराधिकारी म्हणून निवड केली म्हणून एवढे अहंकारी झाला आहात का? तुम्ही पंतप्रधान होणार नाही, कारण ४ जूनला तुमचे सरकार स्थापन होणार नाही, असा दावा केजरीवाल यांनी केला आहे.

योगी आदित्यनाथ काय म्हणाले होते?

योगी आदित्यनाथ यांनी सोमवारी दिल्लीत एका जाहीर सभेला संबोधित करताना आम आदमी पक्षावर निशाणा साधला होता. आप सरकारने देशाची राजधानी दिल्लीचे काय केले आहे, असे मुख्यमंत्री योगी म्हणाले होते. यूपीचा विकास पाहायचा असेल तर दिल्लीची तुलना उत्तर प्रदेशातील गाझियाबाद आणि नोएडाशी करा. आप सरकारने दिल्लीला नरक बनवले आहे. त्या पक्षाच्या लोकांनी त्यांचे गुरू अण्णा हजारे यांनाही सोडले नाही, असा टोला योगी आदित्यनाथ यांनी लगावला होता.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news