

पुढारी ऑनलाईन डेस्क : पंजाबमधील जालंधर येथे लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंधित दोघांना अटक करण्यात आली आहे. पोलीस आणि बिश्नोई टोळीमध्ये यावेळी चकमक झाली. पोलिसांवर गोळीबार केल्याने प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात त्यांच्यापैकी एकाच्या पायाला गोळी लागली. त्यांच्याकडून अत्याधुनिक शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत, असे जालंधरचे पोलीस आयुक्त स्वपन शर्मा यांनी सांगितले.
लॉरेन्स बिश्नोई टोळी गेल्या काही दिवसांपासून देशभरात चर्चेत आहे. मग ते खंडणीचे प्रकरण असो किंवा जीवे मारण्याची धमकी. यामुळे सतत संशयाची सुई लॉरेन्स बिश्नोई टोळीवर असते. जालंधर येथील कुख्यात बिष्णोई गँगशी संबंधित दोघांना पोलिसांनी पाठलाग करून अटक केले. या अटकेदरम्यान गोळीबारही झाला. अटक केलेल्या आरोपींवर खंडणी, खून, शस्त्रास्त्र कायदा आणि एनडीपीएस कायद्यासह अनेक गुन्हे दाखल आहेत. यापूर्वी हिसार स्पेशल टास्क फोर्सने (STF) मंगळवारी लॉरेन्स बिश्नोईचा सहकारी संपत नेहरा याला अटक केली आहे.